किती जणांचे बळी गेल्यावर उड्डाणपूल उभारणार?

0

रामकृष्ण पाटील , कापडणे । दि.21 ।-रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु असतांनाच कापडणे – देवभाने फाट्यावर उड्डाणपुलाची जोरदार मागणी झाली होती. यावेळी रस्ता विकासक कंपनीने खोटं सांगून फसवले आणि प्रशासनाच्या सबंधित विभागाने यात झुलवत ठेवले.

आणखी किती निष्पाप जिवांचे बळी घेणार? आतातरी उड्डाणपुलाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरु करा व नागरीकांच्या जिवाशी सुरु असलेला खेळ बंद करा, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन आज(दि.21) प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना देण्यात आले. कापडणे परिसर ग्रामिण पत्रकार संघाचे सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कापडणे-देवभाने फाटा हा परीसरातील 10-12 गावांना केंद्रस्थानी असणारा थांबा आहे. या फाट्यावरुन हजारो नागरीक धुळे, शिरपुर, दोंडाईचा या व इतर मार्गांना प्रवास करतात.

हा प्रवास करतांना महामार्गावरील सुसाट वाहतुकीतुन वाट काढत, जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. कापडण्याकडुन देवभानेकडे वा देवभान्याकडुन कापडणेकडे ये-जा करतांना मोठी जोखीम पत्करावी लागते. पादचारीसह दुचाकी, चारचाकीस् वाहनांना अनकेदा छोटे-मोठे अपघात होत असतात.

यात अनेकांना प्राण गमवावे लागले असुन काही ग्रामस्थांना अपंगत्वही आले आहे. या फाट्यावर उड्डानपुलाचा अभाव असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, धुळे-पळासनेर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असतांना कापडणे-देवभाने फाट्यावर उड्डाणपुल व्हावा ही परीसरातील ग्रामस्थांची पहिल्या दिवसापासुन मागणी होती.

रस्त्याच्या विकासक कंपनीने मात्र वेळ मारुन नेली. येथील ग्रामस्थ व पत्रकार संघाने त्यावेळी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. मात्र उड्डानपुलाचा प्रस्ताव एनएचएआयच्या माध्यमातुन मंजुरीसाठी पाठविला जाईल असे सांगून प्रशासनाने आंदोलकांचे आमरण उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते.

हा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठस्तरावर पाठविल्याचे पत्रही आंदोलकांना पाठविण्यात आले. प्रत्यक्षात रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले मात्र उड्डाणपुलाचे काम पाठपुरावा करुनही झाले नाही. रस्ता चौपदरीकरण झाल्यापासून उड्डाण पुलाअभावी कापडणे परीसरातील ग्रामस्थांमध्ये असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या देवभाने-कापडणे फाट्यावर उड्डाणपुल नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. याठिकाणी तात्काळ उड्डाणपुल होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या मागणीसाठी पुढच्या आठवड्यापासुन रास्ता रोको, आमरण उपोषण, धरणे आंदोलन केले जाईल. तरी याबाबत तात्काळ निर्णय घेत उड्डाणपुल मंजुरीसाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी निवेदानत करण्यात आली आहे.

निवेदन देण्यासाठी कापडणे परिसर ग्रामीण पत्रकार संघाचे जगन्नाथ पाटील, रामकृष्ण पाटील, जिजाबराव माळी, दीपक पाटील, विठोबा माळी, कॉग्रेसचे धुळे तालुकाध्यक्ष भगवान विनायक पाटील, भाजपा किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष नवल नामदेव पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी, शाम पाटील, अमोल सुरेश बोरसे, माजी ग्रा.पं.सदस्य भगवान माळी, महेश माळी, ललित बोरसे, निलेश पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते. या उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी तात्काळ प्रयत्न न झाल्यास सदरचे आंदोलन तीव्र होणार आहे.

LEAVE A REPLY

*