दुचाकी जाळण्याच्या निषेधार्थ शिरपुरला व्यापार्‍यांचा मूक मोर्चा

0

शिरपूर । प्रतिनिधी-शहरात दुचाकी जाळण्याचा प्रकार घडल्याने या घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी तसेच जैन समाज बांधव, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक यांनी बाबुराव वैद्य मार्केटपासून पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढला. आरोपींवर सक्त कारवाई करण्यात यावी, तसेच कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यात यावीत, यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

या पार्श्वभुमिवर आज दि.21 नोव्हेंबर रोजी दिवसभर शिरपूर शहरात बंद पुकारण्यात आला होता. मात्र दोन्ही संशयीतांना अटक झालेली असल्याने उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केलेल्या आवाहनानंतर दुपारपासून बंद मागे घेण्यात येऊन बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरु झाले.

याप्रसंगी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसून जैन, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, कैलासचंद्र अग्रवाल, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन गिरासे, भाजपाचे डॉ.जितेंद्र ठाकूर, बबनलाल जैन, मर्चंट बँकेचे संचालक नवनीत राखेचा, अ‍ॅड. शांताराम महाजन, शिवसेनेचे राजू टेलर, विशाल जैन, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक, सर्व पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.

शिरपूर येथील अरिहंत व नवजीवन ट्रेडींग या होलसेल किराणा दुकानाचे मालक व व्यापारी विशाल इंदरचंद जैन यांच्याकडे दि. 10 नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी भावश्या ऊर्फ रुपेश अर्जुन माळी (वय 32) याने सात लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती.

त्यास नकार दिल्याच्या कारणावरून दि.17 नोव्हेंबर रोजी रात्री शिरपूर शहरातील टी.एम.सी. शेडजवळ संशयित भावश्या व त्याचा साथीदार शेखर नारायण कोळी (साळवे)(वय 26) यांनी विशाल जैन यांची दुचाकी अडवून त्यांना मारहाण केली होती.

त्यांच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. त्यानंतर संशयित फरार झाले होते. गुजराथ राज्यात तपासासाठी गेलेले पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर यांना दोन्ही संशयित सुरत येथे असल्याची माहिती मिळाली. त्यांनी माग काढत उधना भागात फिरणार्‍या संशयिताना दुपारी दोनला अटक केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय सानफ, उपनिरीक्षक मुकेश गुजर यांनी ही कामगिरी बजावली.

पोलिसांचे कौतुक
येथील व्यापार्‍यावर हल्ला करून दुचाकी जाळल्याच्या गुन्ह्यातील दोन्ही संशयितांना शिरपूर पोलिसांच्या पथकाने काल दुपारी सूरत (गुजराथ) येथून अटक केली. पोलीस यंत्रणेने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करुन व अतिशय चांगले नियोजन करुन शिताफीने व जलद गतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयीतांना अटक केल्याबद्दल माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, व्यापारी व नागरीकांनी यांनी पोलिसांच्या कामगिरीचे जाहीररीत्या अभिनंदन व कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

*