सारंगखेडा बॅरेजमधून अमरावती धरण भरा !

0

धुळे । दि.20 । प्रतिनिधी-प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेस निधी मिळत नसेल अथवा विलंब होत असेल तर सारंगखेडा बॅरेजमधून स्वतंत्र अमरावती धरणापर्यंत पाईप लाईन टाकण्यात यावी. किमान या योजनेला 40 ते 50 कोटी अंदाजित खर्च येवू शकतो.

अत्यंत कमी खर्चात अमरावती प्रकल्पात येणार्‍या 30 ते 35 गावांना कायमस्वरुपी पिण्याचा व शेतीसाठी पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी मागणी प्रकाशा बुराई सिंचन योजना संघर्ष समितीतर्फे आज पत्रपरिेषदेत करण्यात आली. तत्पुर्वी समितीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन यासंदर्भातले निवेदन सादर केले.

पत्रपरिषदेत बोलताना शिंदखेडा पं.स.सदस्य प्रा. सतीश पाटील म्हणाले की, सध्या बुराई नदीला वाहून जाणारे पाणी अमरावती धरणात टाकण्यात यावे. बुराई नदीवरील ज्या गावांना पाणी मिळते, त्यांचे पाणी आरक्षित व संरक्षित राहून उरलेल्या पाण्याने फक्त दोन किलोमीटर पाटचारी करुन अमरावती धरणात किमान पिण्याच्या पाण्यासाठी पाणी टाकण्यासंदर्भात शासनाने जिल्हाधिकार्‍यांना परवानगी द्यावी.

ते पाणी घेवून जाण्यासाठी शासनाला कुठलाही आर्थिक भार न सोसता शेतकरी स्वखर्चाने नेण्यास तयार आहे. गेल्या अनेक वर्षापासून सदरची उपसा सिंचन योजना मंजूर असून शासनाकडून कामाला गती मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे निधी मिळत नाही, असे सतिश पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सदर योजनेस विलंब होत असून त्यावरील खर्च वाढत आहे. सतत दुष्काळामुळे धरणात पाणी नाही, शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे.

त्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी निवेदने, रास्तारोको अशी आंदोलने केली आहेत. जिल्हाधिकारी कचेरीसमोर गेल्यावर्षी यासाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले होते.

याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने एक लक्ष स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. संबंधित स्वाक्षरी मोहिमेचे निवेदन संबंधित यंत्रणेला देण्यात येणार असून हिवाळी अधिवेशनात विधान भवनासमोर एक हजार शेतकर्‍यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार असल्याचा यावेळी सतीश पाटील यांनी दिला.

पत्रकार परिषदेला प्रकाशा बुराई सिंचन योजना संघर्ष समितीचे पदाधिकारी तथा शिंदखेडा पंचायत समिती सदस्य सतीष रामराव पाटील, नंदुरबार जि.प.चे माजी अध्यक्ष वकील पाटील, राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग गिरासे, पं.स.सदस्य मनोहर देवरे, ग्रा.पं. माजी सदस्य शांतीलाल गोराणे, दामोधर माळी, संतोष पाटील, कमलेश पाटील, अभय पाटील, चंद्रकांत पाटील, पंढरीनाथ अहिरे, काशिनाथ पाटील, रामसिंग राजपूत, ज्ञानेश्वर पाटील, कांतीलाल पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*