नगराध्यक्षपदासाठी सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार

0

प्रदीप दीक्षित,शिंदखेडा । दि.20-शिंदखेडा नगरपंचायत नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव असल्याने जवळपास सर्वच पक्षांचे नगराध्यक्षपदाचे महिला उमेदवार निश्चितीच्या मार्गावर आहेत. काही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असून काही पक्षांच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्याची मतदारांना प्रतिक्षा आहे.

नगरपंचायतीच्या 17 नगरसेवकांसह लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी निवडणुक प्रक्रीया सुरू आहे. नगरसेवक पदासह नगराध्यक्षपदासाठीही उमेदवारांची चाचपणी पक्षांतर्फे सुरु आहे.काँग्रेस,राष्ट्रवादी, समाजवादी, भाजपा, शिवसेना या पक्षांतर्फे कोण उमेदवार असतील, याची उत्सुकता लागली असतानाच यासाठी महत्वपूर्ण राजकीय खेळी सुरु झाली आहे.

भाजपातर्फे सौ.रजनी अनिल वानखेडे यांचे नाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निश्चित झाले आहे. त्यांच्यासमोर उमेदवार देण्यासाठी विरोधकांनी तयारी सुरू केली आहे.

मतांची जुळवणी, सामाजिक परिस्थिती व जातीचे गणित पाहून उमेदवार निवडीला प्राधान्य दिले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व समाजवादी हे ‘त्रिकुट’ एकत्र येण्याची चर्चा चांगलीच चर्चेत आली होती. मात्र समाजवादी पक्ष स्वतंत्र लढण्याच्या मार्गावर असून त्यांनी मुस्लीम घटकातील महिला उमेदवार पुढे आणला आहे. बिसमिल्हा बी.गुलाम हुसेन खान यांचे नाव नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे.

समाजवादी विचारसरणीचे स्व.ठाणसिंग जिभाऊ यांचे जवळचे समर्थक इलीयासभाई कुरेशी यांच्या कन्येला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देवून विजयसिंह राजपूत जुने राजकीय समिकरण जोडण्याच्या मार्गावर आहेत.

येथील डॉ.इद्रीस कुरेशी यांच्या त्या भगिनी आहेत. श्रीमती बिसमिल्लाबी गुलाम हुसेन खान यांचे नाव चर्चेत आहे. यामुळे काँग्रेसबरोबर विजयसिंह राजपूत निश्चितच गणित जुळवणार नाहीत, अशी परिस्थिती आज तरी आहे.

काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून प्रा.सुरेश देसले यांच्या भगिनी श्रीमती मालतीबाई शामकांत देशमुख यांचे नाव निश्चित झाले आहे. असे असले तरी विद्यमान सभागृह नेते दिपक देसले यांच्या पत्नी सौ. प्रगती दिपक देसले यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह होत आहे. दिपक देसले हे प्रा.देसले यांचे पुतणे आहेत. परंतु आज तरी श्रीमती मालतीबाई देशमुख यांचे नाव काँग्रेसतर्फे निश्चित करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुक स्वतंत्र लढणार असून सौ.कलावती माळी या पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सौ.कलावती माळी या माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक राकेश माळी यांच्या मातोश्री आहेत.त्याचबरोबर शिवसेनाही स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात असणार आहे. त्यांच्यातर्फे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते रमेश भगवान माळी यांच्या पत्नी सौ.लताबाई रमेश माळी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

भाजपातर्फे गटनेते अनिल वानखेडे यांच्या सुविद्य सौ.रजनी वानखेडे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असणार आहे. त्याचे सुतोवाच ना.जयकुमार रावल यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले होते.सौ.रजनी वानखेडे या पदवीधर आहेत. नगराध्यक्ष शहरातील सुमारे 20 ते 22 हजार मतदारांचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

गावाच्या विकासासाठी ना.जयकुमार रावल यांचे मिळणारे सहकार्य व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या माध्यमातून येणारा विकास निधी यामुळे काँग्रेसला रामराम करीत अनिल वानखेडे आपल्या समर्थकासह निवडणुकीपुर्वीच भाजपात दाखल झालेले असल्याने इथली राजकीय समिकरणे बदलली आहेत.

LEAVE A REPLY

*