कापडणे-देवभाने परिसरासाठी उड्डाणपुलाअभावी महामार्ग अपघाताचा सापळा : अनेकांचे बळी

0

रामकृष्ण पाटील | कापडणे  :  रस्ते विकासाच्या रक्तवाहिन्या असतात, परंतू या रक्तवाहिन्याच लोकांच्या जीवावर उठुन रक्तपिपासू झाल्याचे चित्र कापडणे-देवभाने परीसरातील ग्रामस्थांबाबत निर्माण झाले आहे. कालच्या (दि.१७) अपघातात अभियंत्यांसह सुपरवायझर ठार झाल्याने, मुंबई-आग्रा हा हाय-वे महामार्ग की महामार्ग? असा भितीदायक सवाल ग्रामस्थांसमोर पुन्हा एकदा उभा राहिला आहे.

या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असतांना कापडणे- देवभानेसह परीसरातील ग्रामस्थांनी या फाट्यावर उड्डानपुल उभारण्याची मागणी केली होती. परंतू जिल्हा प्रशासन व एनएचएआय सह रस्ता विकसक आणि लोकप्रतिनिंधींनी केवळ तोंडाला पाने पुसली. त्या दिवसापासुन जे येथे मृत्यूचे तांडव सुरु झाले ते आजतागायत सुरुच आहे.

देवभाने-फाट्यावर उड्डानपूल वा भुयारी मार्ग न झाल्याने गेल्या ६ वर्षात अनेकांच्या नशिबी अपघाती मृत्यू आला आहे. याठिकाणी उड्डाणपूल वा भुयारी मार्गाची निकड लक्षात घेता हा प्रश्न अधोरेखीत होत पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कोणत्याही भागाच्या विकासाचा स्पिड हा निर्माण झालेल्या रस्त्यांच्या जाळ्यावर अवलंबुन असतो. त्या-त्या भागातील रस्ते हे विकासाला गती देत असले तरी कापडणे-देवभाने परीसरातील प्रवाशांना मात्र हाच रस्ता मृत्यूचा महासापळा ठरत आहे. काल (दि.१७) पुन्हा एकदा या दु:ख्यास या परीसरास सामोरे जावे लागले.

कापडण्याहुन निघुन रस्त्यास लागत असतांनाच उप अभियंता सुधाकर थोरात यांच्यासह दाजभाऊ पाटील ठार झाले. मृतदेह सव्वा तास रस्त्याच्या कडेला पडलेला राहिला. अपघातस्थळावरील प्रत्येक माणुस या दुख्याने गारठला. आणि या फाट्यावरील उड्डान पुलाचा व अंडरपासचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखीत झाला. जीव मुठीत धरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत झाल्याचे चित्र स्पष्ट आहे.

हा प्रश्न मार्गी न लागल्यास सबंधित यंत्रणेसाठी येणारा काळ निश्चितच डोकेदुखी वाढविणारा आहे. तसे वातावरण निर्माणही झाले आहे. याबाबत तात्काळ निर्णय घेत महामार्ग मृत्यूमार्ग होण्यापासुन वाचविण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

११६१ किलोमीटरमधील डेंजर झोन स्टॉल

मुंबई-आग्रा हा ११६१ किलोमीटरचा महामार्ग. मुंबई-आग्रा या दोन्ही टोकांच्या महानगरांव्यतिरिक्त ग्वाल्हेर, इंदौर, धुळे, नाशिक व ठाणे ही रस्त्यातील महत्वाची शहरे. या क्रमांक तीनच्या राष्टीय महामार्गावरील अपघाताच्या प्रमाणाचा विचार केला तर, दुर्देवाने देवभाने परीसरातील पट्ट्याचा टॉप टेन मध्ये नंबर लागल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

या अपघाताच्या श्रृंखलेत इतर कारणेही असतीलही परंतू सोनगीर व धुळे दरम्यान भुयारी मार्ग व उड्डानपूलाचा अभाव, सदोष रस्ते व सब वे, चुकीच्या ठिकाणी उभारलेले पिक अप पॉईन्ट आदींमुळे हे प्रमाण वाढल्याचे जाणवते.

LEAVE A REPLY

*