‘जलयुक्त’ची कामे जूनअखेर पूर्ण करा !

0

धुळे । दि.11 । प्रतिनिधी-जलयुक्त शिवार अभियान या महत्वाकांक्षी उपक्रमातील 2017-18 या वर्षातील सर्व कामे जून 2018 अखेर पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण ना.प्रा. राम शिंदे यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियानाची नाशिक विभागीय आढावा बैठक आज सकाळी शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जळगाव जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आ.श्रीमती स्मिता वाघ, आ.डी.एस. अहिरे, आ. उन्मेश पाटील, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, धुळे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी ए.ए.महाजन, जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, नाशिकचे जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन, नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (नंदुरबार), यांच्यासह विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेसह संबंधित विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातंर्गत निवड झालेल्या गावांत वॉटर बजेटनुसार नियोजन करावे. या अभियानातील कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. अभियानातील कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी वेळोवेळी पाहणी करावी. तसेच शिल्लक कामे तत्काळ सुरू करावीत. जिओ टॅगिंगची कामे शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करावीत, असेही निर्देश मंत्री प्रा. शिंदे यांनी दिले.

टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या क्रांतीकारक योजनेतून गेल्या तीन वर्षात संपूर्ण राज्यात झालेल्या कामांच्या माध्यमातून भूगर्भातील पाणी पातळी वाढली आहे.

नाशिक विभागात जलयुक्त शिवार योजनेची कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात आलेली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.जलयुक्त अभियान हे दुष्काळमुक्तीसाठी वरदान असून यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

या निधीचा काटेकोरपणे शासन निर्णयानुसार अवलंब करावा. विभागातील प्रत्येक जिल्ह्याने हा निधी तातडीने उपलब्ध करुन मार्चपर्यंत कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही प्रा. शिंदे यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या.

मृद व जलसंधारण विभागाचे सचिव श्री. डवले यांनी सांगितले, 2017- 2018 चा आराखडा राबविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना सचिव श्री. डवले यांनी दिल्या.

नाशिक विभागात वर्ष 2016-17 मधील निवडण्यात आलेल्या 900 गावांमध्ये 28,226 विविध जलसंधारणाच्या कामांचे उद्दिष्टे ठेवण्यात आलेली होती.

यापैकी आजअखेर 22,962 कामे पूर्ण झाली असून 2,814 कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित 2,409 कामे मार्च 2018 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकसहभागातून व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यातील 213.70 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. 2016-17 मध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा 858.64 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून आजअखेर 482.19 कोटी खर्च करण्यात आला आहे.

निवडण्यात आलेल्या 900 गावांपैकी 542 गावांमध्ये 100 टक्के काम पूर्ण करण्यात आले असून 282 गावांमध्ये 80 टक्के कामे 61 गावांमध्ये 50 टक्के कामे व 15 गावांमध्ये 30 टक्केपेक्षा जास्त कामे करण्यात आली आहेत.

या कामांच्या माध्यमातून 14 लक्ष 1 हजार 426 घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला असून त्यापैकी 11 लक्ष 4820 हेक्टर क्षेत्र संरक्षीत सिंचनाखाली आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले, विभागात जलयुक्त अभियानांतर्गत 2015-16 मध्ये 941 गावे, 2016-17 मध्ये 900 व 2017-18 मध्ये 846 गावे असे एकूण 2,687 गावांची निवड करण्यात आलेली आहे.

सन 2015-16 मधील 941 गावांमधील 39,345 कामे पूर्ण असून लोकसहभाग व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यातील 164.39 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. 2015-16 मध्ये निवडलेली सर्व गावे जलपरीपूर्ण झाली असून यामुळे 20 लक्ष 9 हजार 221 घटमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला असून त्यातून 16 लक्ष 193 हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे.

यावेळी नाशिक विभागातील जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे (धुळे), ए.ए.महाजन (अहमदनगर), श्री. राधाकृष्णन (नाशिक), डॉ.एम.एस.कलशेट्टी (नंदुरबार), किशोरराजे निंबाळकर (जळगाव) यांनी आपापल्या जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमातंर्गत करण्यात आलेल्या कामांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी केले. यावेळी महसूल, कृषी, सिंचन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुसुंबाचे प्रभारी मंडळ कृषी अधिकारी रमेश पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.

 

कामे जलयुक्तची, श्रेय ‘शिरपूर पॅटर्न’ला भाजपा पदाधिकार्‍यांचा आरोप अन् दहितेंचा खुलासा

जलयुक्ततुन कामे होत असतांना श्रेय मात्र ‘शिरपूर पॅटर्न’च्या नावाखाली घेतले जात आहे. अशा बंधार्‍यांच्या उद्घाटनाला शासकीय अधिकार्‍यांना बोलाविले जात नाही. मात्र जलयुक्तची कामे असतांना शिरपूर पॅटर्नमधून जाहीर केले जाते, अशी तक्रार भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, वैद्यकीय आघाडीचे डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी ना.प्रा.राम शिंदे यांच्याकडे बैठकीत केली.

यावर प्रा.राम शिंदे यांनी सांगितले की, हे अभियान सर्व घटकांनी मिळून राबवायचे आहे. अण्णा हजारे, पोपटराव पवार, श्रीश्री रविशंकरजी, सुरेश खानापुरकर यांच्यासह राज्यातील विविध जलतज्ज्ञांची व सामाजिक संस्थांची मदत घेवून आपण अभियान यशस्वी करीत आहोत.

मात्र यासंदर्भात कोणी असे भासवले तर दखल घेतली जाईल असे ना.शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर भाजपा पदाधिकार्‍यांनी संबंधित अधिकारी उपस्थित आहेत का अशी विचारणा केली. मात्र ‘प्रश्न मला विचारा, मी अधिकार्‍यांकडून उत्तर घेतो.’ असे सांगुन शिंदे यांनी यासंदर्भातले निवेदन स्विकारले.

यावर जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांनी भाजपा पदाधिकार्‍यांना आपल्या शैलीत उत्तर दिले. जिल्हा परिषदेमार्फत आदिवासी भागासाठी निधी दिला जातो.

त्यामुळे शिरपूर आणि साक्रीला देण्यात येणार्‍या निधीमधून देखील जलयुक्तची कामे होतात, त्यात जिल्हा परिषदेने मदत केलेली असते.

आ.अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही कामे केली जात आहेत. परिणामी तालुक्यात मोठ्या सिंचन क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे भाजपा पदाधिकार्‍यांचे म्हणणे खरे नसल्याचे दहिते यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर स्मित हास्य करून ना.शिंदे यांनी पडदा टाकला.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

*