तरुणावर प्राणघातक हल्ला; बुलेट जाळली

0

धुळे । दि.11 । प्रतिनिधी-शहरातील मिल परिसरात असलेल्या संभाप्पा कॉलनीत सशस्त्र टोळीने एका घरावर हल्ला करुन तरुणाला तलवारीने भोसकून आणि दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच तरुणाच्या घरातील साहित्याची हल्लेखोरांनी तोडफोड करुन बुलेट जाळली. असा आरोप जखमीच्या कुटुंबियांनी केला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत माहिती अशी की, शहरातील मिल परिसरात संभाप्पा कॉलनीत प्लॉट नं. 80 येथे मिलींद चौधरी हे राहतात. काल दि. 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्री एका सशस्त्र टोळीने चौधरी यांच्या घरावर हल्ला केला.

तेथे हल्लेखोरांनी धुमाकूळ घालून त्यांच्या घरातील साहित्यांची तोडफोड केली तसेच घराच्या कंपाऊंडमध्ये लावलेली बुलेट ज्वलनशील पदार्थ टाकून हल्लेखोरांनी जाळून टाकली.

तसेच चौधरी यांच्यावर टोळीने हल्ला करुन त्यांना तलवार आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यात चौधरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चौधरी यांच्या घरावर हल्ला का करण्यात आला याचे कारण समजलेले नाही. संभाप्पा कॉलनीत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

 

LEAVE A REPLY

*