जलयुक्त अभियान राज्याला समृद्ध करणारी योजना

0

धुळे । दि.11 । प्रतिनिधी-राज्यातील पाच हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. महाराष्ट्राला समृध्द करणारी ही योजना आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांनी केले.

शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात विभागीय स्तरावरील राजमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार वितरण सोहळा ना. प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आ. श्रीमती स्मिताताई वाघ, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, धुळे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी ए.ए.महाजन, जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे आदी अधिकारी उपस्थित होते.

ना.प्रा.शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानाची नाशिक विभागातील कामगिरी समाधानकारक आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी 70 टक्के एरिया ट्रीटमेंट अंतर्गत दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. ओघळ नियंत्रणाची तीस टक्के कामे हाती घेण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या विभागात हेच प्रमाण 80: 20 असे करण्याचा चांगला प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियानात धुळे जिल्हा अग्रेसर होईल, असेही त्यांनी नमूद केले.

या अभियानांतर्गत उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे, शास्त्रीय पध्दतीने नियोजन करावे. जलयुक्त शिवार अभियानातून शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी आपला शेतमाल युरोपच्या बाजारपेठेत पोहोचवला ही कौतुकाची बाब आहे. त्यांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळेच हे शक्य झाले आहे.

पुरस्कारांच्या माध्यमातून अन्य अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रेरणा मिळेल. या अभियानाच्या यशस्वितेमध्ये माध्यमांचा सहभाग मोठा राहिला आहे. त्यामुळे माध्यमांतील प्रतिनिधींनाही गौरविण्यात आले आहे, असेही मंत्री प्रा. शिंदे यांनी सांगितले.

आ. श्रीमती वाघ म्हणाल्या, या अभियानामुळे चांगली कामे होत असून शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकरी सुखी व समाधानी होण्यास मदत होईल.जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, या अभियानामुळे ग्रामीण भागाचा चेहरा- मोहरा बदलण्यास मदत होत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी बी.के.जेऊरकर यांनी पुरस्कारांची पार्श्वभूमी विशद केली.

पुरस्कारार्थींतर्फे मनोगत व्यक्त करताना सनाबाई विठ्ठल अस्वले म्हणाल्या, जलयुक्त शिवार अभियानामुळे गावातील पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

पाणी आणण्यासाठी आता दूरवर जावे लागत नाही. कायरे, ता. पेठ, जि. नाशिक येथील पुंडलिक सातपुते म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकरी आता टोमॅटो, भाजीपाला उत्पादन घेवू लागले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी प्रास्ताविक केले. जगदीश देवपूरकर, रमेश पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

*