चौपाटी परिसरात नागरिकांची स्वयंस्फूर्तीने स्वच्छता 450 नागरिकांचा सहभाग : महापालिका प्रशासनाने घेतली दखल

0

धुळे । दि.8 । प्रतिनिधी-शहरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या चौपाटी परिसराची स्वच्छता नागरिकांनी आज स्वयंस्फूर्तीने केली. याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे.

हिवाळ्याला सुरुवात झाली असून आरोग्य संवर्धनासाठी पहाटे मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक पहाटे नदीकिनारी असलेल्या चौपाटीवर मॉर्निंग वॉकसाठी येतात.

या चौपाटीवरील फेरीवाले हटविल्यामुळे चौपाटीची दूरवस्था झाली आहे. चौपाटीलगत असलेल्या रस्त्यावरील दोन्ही बाजूस अस्वच्छता झाली असून काटेरी झुडुपांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे मॉनिर्र्ंग वॉक करणार्‍यांना अप्रसन्न वाटते. म्हणून चौपाटीवर फिरणार्‍या सर्व नागरिकांनी आज स्वयंस्फूर्तीने चौपाटीलगत असलेल्या सुमारे एक किमी अंतराची स्वच्छता केली.

स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांनी स्वत:हून झाडू, फावडा व स्वच्छतेचे साहित्य आणले होते. या मोहिमेत डॉक्टर्स, वकील, प्रतिष्ठीत व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होवून स्वच्छता केली.

सुमारे 400 ते 500 नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. रस्त्यालगत असलेले झुडूपे, केरकचरा आणि अनावश्यक साहित्य जमा करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून स्वयंस्फूर्तीने झालेल्या या स्वच्छता मोहिमेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*