लळींगजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

0

लळींग । दि.7 । वार्ताहर-मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या लळींग कुरणातील एका मादी बिबट्या महामार्ग ओलांडत असतांना आज दि.7 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहाटे साधारणपणे चार वाजेदरम्यान एक मादी बिबट्या कुरणालगतचा महामार्ग ओलांडत असतांना त्या बिबट्याला भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याच्या डोक्याला तसेच कमरेला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनेचा पंचनामा करून पथकाने मृत बिबट्याची पशुवैद्यकांमार्फत उत्तरीय तपासणी केली.

त्यानंतर कुरणातील लांडोर बंगला याठिकाणी मृत बिबट्याला जाळण्यात आले. या बिबट्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे यावेळी पशुवैद्यक यांनी सांगितले.

विशेष बाब म्हणजे, ही मादी बिबट्या आपल्या बछड्यांसोबत आली असावी असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. त्यामुळे महामार्गलगतच्या कुरण परिसरात त्यांचा शोध घेतला जाणार आहे.

यापूर्वी देखील अनेकदा महामार्गावरील भरधाव वेगातील वाहनांच्या धडकेत कुरणातील बिबट्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

लळींग कुरणाच्या वैभवात भर टाकणार्‍या तसेच बोटावर मोजण्या इतपत कमी संख्येने असणार्‍या या प्राण्यांचा अशा प्रकारे नाहकपणे बळी जात असल्याने वन्यप्रेमी संघटना तसेच निसर्गप्रेमी नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.

तर, याबाबत वनविभागाने योग्य ते उपाय योजून महामार्गावर वन्य प्राण्यांचे जाणारे नाहक बळी आटोक्यात आणावेत अशी मागणी देखील केली आहे.

दरम्यान यावेळी वनक्षेत्रपाल सी.एच.पाटील, पशुवैद्यक अधिकारी डॉ. पी.जी.कोमलवार, डॉ. व्ही.जी.देशमुख, वनपाल वाल्मिक पाटील, विठ्ठल पवार, वनरक्षक दिलीप भामरे, झेड.एम.बाविस्कर, वनमजूर राजेंद्र देसले यांच्यासह इरकॉन कंपनीचे पेट्रोलिंग पथक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*