कारची धडक : विद्यार्थी जखमी

0

कापडणे । दि.7 । प्रतिनिधी-सोनगीरकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणार्‍या कारने आज दि.7 रोजी सरवड ता.धुळे फाट्यावर रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा असलेला शाळकरी विद्यार्थ्याला धडक दिली.

त्यामुळे सदर विद्यार्थी सुमारे 20-25 फुट लांब फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्यावर धुळ्यातील सुधा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्याच्या लहान भावास सुर्देवाने काही लागले नाही. याबाबत सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, विद्यार्थी दिनालाच विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने सरवड फाट्यावर गतीरोधक बसविण्यात यावे यासाठी रस्तारोको करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, वडताल (गुजरात) येथील एक धार्मिक कार्यक्रम आटोपुन भुसावळ येथील स्वामी नारायण मंदिराचे महंत धर्मस्वरुपदास हे भुसावळ येथे जात होते.

त्यांच्या कार (जीजे23एन2001) चा चालक मुरली मनोहरदास हा भरधाव वेगाने गाडी चालवत होता. यावेळी सरवड फाट्यावर, रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या विद्यार्थी मोहन बोंडा वळवी (वय15) याला जबर धडक दिली.

धडक इतकी जबर होती या गाडीच्या पुढच्या भागास हा शाळकरी विद्यार्थी ठोकला जावुन सुमारे 20-25 फुट तो फेकला गेला. अरुण बोंडा वळवी (वय13) हा त्याचा लहान भाऊही यावेळी त्याच्यासोबत होता पण सुर्देवाने त्याला काही लागले नाही.

दोघे भाऊ बुरझड येथील के.आर. पाटील विद्यालयात इयत्ता नववी व सातवीत शिक्षण घेत आहेत. तर गावातीलच जनता विकास मंडळाच्या वसतीगृहात ते राहतात. दिवाळीच्या सुट्या आटोपुन ते आज शाळेत जाण्यासाठी निघाले होते. खडक्या (कोकरं) (ता. धडगाव) येथील हे विद्यार्थी आहेत.

सरवड फाट्यावर अपघात होणे हे नेहमीचेच झाल्याने ग्रामस्थांमधून रोष व्यक्त करण्यात आला. सरवड व परिसरातील ग्रामस्थांनी काही वेळ रास्तारोको करीत गतीरोधक बसविण्याची मागणी केली.

 

LEAVE A REPLY

*