साडेसात लाख दिव्यांगांना कृत्रिम साहित्य वाटप

0

धुळे । दि.6 । प्रतिनिधी-देशात राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत आतापर्यंत 550 शिबिरे घेण्यात आली असून साडेसात लाख दिव्यांग व्यक्तींना विविध कृत्रिम साहित्याचे वितरण करण्यात आले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयातर्फे राष्ट्रीय वयोश्री योजना, एडीप योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुलात आज सकाळी जिल्ह्यातील दिव्यांगाना व्हीलचेअर, बैसाखी, ऐकू येण्याचे मशीन, टेट्रापॉड, ट्राइपॉड, वॉकिंग स्टीक, चष्मे, बत्तीशी आदी कृत्रिम साहित्य मोफत वाटपाचा कार्यक्रम झाला.

त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे, जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, खा.डॉ.हिना गावित, जि. प. समाजकल्याण समिती सभापती मधुकर गर्दे, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, लिम्कोचे वरीष्ठ व्यवस्थापक बी. के. गुप्ता आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते किशोर रामदास वाणी, जैबुन्नीसा गमूर, कस्तुराबाई सोनवणे, प्रदीप कोळी, पूनम महाजन, विशाल दिवटे, रमणबाई फुलपगारे, प्रशांत कुलकर्णी, सुशीला भट आदींना प्रातिनिधीक स्वरुपात साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात स्टॉल मांडण्यात आले होते.

यावेळी ना. आठवले म्हणाले, देशात 2011 च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार 10 कोटी 38 लाख वयोवृध्द आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून आवश्यक कृत्रिम साहित्य पुरविण्यात येत आहे. त्यासाठी लिम्को कंपनी कार्यरत आहे. तसेच आगामी काळात दिव्यांगांना इलेक्ट्रीक व्हीलचेअर देता येईल का याबाबत लिम्को कंपनी प्रयत्नशील आहे.

दिव्यांगांना मदत करण्यासाठी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय नेहमीच तत्पर असते. या शिबिरासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरे घेण्यात आली. त्यातून 2491 लाभार्थ्यांना दीड कोटी रुपये खर्चून 6125 उपकरणांचे वितरण करण्यात येत आहे. याच योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात शिबिराचे आयोजन करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही ना.आठवले म्हणाले.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी सरकार कटिबध्द आहे. ज्येष्ठांच्य अडचणी सोडविण्यासाठी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयातर्फे प्रयत्न केले जातील. मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मार्गाचे भूमिपूजन लवकरच होईल. सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजनेसाठी आपला पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पालकमंत्री ना.भुसे यांनी सांगितले, दिव्यांगांसाठी राखीव तीन टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असेही नमूद केले.

खा. डॉ. गावित म्हणाल्या, प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग, ज्येष्ठांना राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर शिबिरांचे आयोजन करावे. यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती मधुकर गर्दे, लिम्कोचे वरीष्ठ व्यवस्थापक देवेंद्र सिंह यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे म्हणाले, धुळे व नागपूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात आला होता.

या योजनेसाठी जिल्ह्यातील 2491 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना 6125 उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

प्रारंभी अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. वाहिद अली सय्यद व पूनम बेडसे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*