अक्कलपाड्याचे पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचल्याचा आनंद : माजीमंत्री रोहिदास पाटील यांचे प्रतिपादन

0

धुळे |  प्रतिनिधी :  अक्कलपाडा धरणाच्या निर्मितीचा आरखडा तयार करतांनाचा डाव्या व उजव्या कालव्यातून गोंदूर, निमडाळ, कोठरेे यांच्यासह गोताणे, उडाणे, आणि सांजोरी अशी छोटी मोठी धरणे भरण्याचा समावेश करण्यात आला होता त्यानुसार आज ही धरणे भरली गेली आहेत.

अक्कलपाडा धरणाचे पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचले आहे याचा मला आज खरा मनापासून आनंद असल्याचे माजीमंत्री रोहिदास पाटील यांनी आज अक्कलपाडा उजव्या कालव्या जम्बो कॅनॉलमधुन पाणी सोडतांना सांगितले.

गोताणे येथून अक्कलपाडाच्या उजव्या कालव्यातून जम्बो व एक्सप्रेस कॅनॉल जातो. या दोनही कालव्यातून हरणमाळ तलाव भरला जातो. दरम्यान जम्बो कॅनॉलमधून पाणी सोडण्याची मागणी गोताणे, उडाणे, सांजोरी, कुंडाणे येथील शेतकर्‍यांची व ग्रामस्थांची होती.

त्यानुसार   माजीमंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते गोताणे येथे जम्बो कॅनॉलमधे पाणी सोडण्यात आले. यावेळी बोलतांना माजीमंत्री पाटील म्हणाले कि, अक्कलपाडा पूर्ण होवून त्यात आज ७० टक्के पाणी साठा आहे. या धरणाच्या निर्मीतीचा आराखडा तयार करतांनाच डावा व उजवा कालवा आखण्यात आला होता.

त्यात डाव्या कालव्यातून गोंदूर, निमडाळे, कोठरे ही धरणेही भरण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले होते त्यानुसारच आज गोंदूरसारखी धरणे भरण्यात आली आहेत. तर उजव्या कालव्यातून शहरासाठी पाणी आरक्षित होते. तसेच गोताणे, उडाणे, सांजोरी येथील तलावही या पाण्याचे आता जम्बो कॅनॉलच्या पाण्यातून भरण्याची सूरूवात होणार आहे.

दरम्यान डाव्या व उजव्या कालव्याच्या मुख्य तसेच पोटचार्‍यातून शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत आता पाणी पोहचले आहे. त्यामुळे आज मला खर्‍या अर्थाने आनंद होत आहे. अक्कलपाडा डाव्या कालव्यातून एकूण ८ हजार हेक्टर क्षेत्र भिजणार आहे तर उजव्या कालव्यातून चौगाव, गोताणे, उडाणे, सांजोरी, कुंडाणे, मोराणे प्र.ल., खेडे गावातील शेतकर्‍यांना फायदा होणार असून त्याचे एकूण १ हजार ६ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे.

तसेच विहीरींचीही पाण्याची पातळी वाढणार आहे. कुंडाणे, सांजोरी, उडाणे येथील पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांही फायदा होवून भविष्यात निर्माण होणारी पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

यावेळी समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, माजी प.स.सभापती भगवान गर्दे, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे संचालक अर्जुन पाटील, सरपंच भगवान पाटील, सुतगिरणी संचालक बापू नेरकर, कॉंग्रेस उपाध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी, किशोर शिंदे, अशोक सुडके, माजी उपसरपंच हिरालाल पाटील, विकासोचे माजी चेअरमन धुडकू पाटील, संचालक महारू पाटील, पांडूरंग पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सरदार पाटील, सदस्य दाजभाऊ पाटील, शिवाजी पाटील, एकनाथ बाळा पाटील, भास्कर पाटील, धर्मराज बागुल, सदस्य तुकाराम पाटील, सरपंच गणेश गवळी, माजी उपसरपंच वसंत पाटील, प्रकाश पाटील, मोराणे सरपंच प्रविण कोळी, संचालक बापू खैरनार, विनायक पाटील, नामदेव पाटील, पिंटू पाटील, कैलास पाटील, श्रीराम पाटील, महाळू पाटील, निंबा शिंदे, एकनाथ देवरे, ज्ञानेश्‍वर पाटील, विठ्ठल पाटील, यांच्यासह कुसूंबा, कुंडाणे, सांजोरी, उडाणे येथील शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ.दत्ता परदेशी यांनी केले.

LEAVE A REPLY

*