2407 कोटींच्या सुधारीत प्रस्तावास मान्यता

0

दोंडाईचा । दि.2 । प्रतिनिधी-शिंदखेडा तालुक्यातील 48 गावातील 26,907 हेक्टर तसेच धुळे तालुक्यातील 23 गावातील 6460 हेक्टर असे एकुण 33367 हेक्टर जमिनीत सिंचन निर्माण करणार्‍या सुलवाडे -जामफळ उपसा जलसिंचन योजनेसाठी 2407.67 कोटींच्या सुधारीत प्रस्तावास राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने मान्यता प्रदान केली आहे. ना. जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी सदर योजनेसाठी अनेक वर्ष पाठपुरावा सुरू होता. सुलवाडे जामफळ उपसा योजना राज्य शासनाच्या सिंचन विषयक चौकशींच्या फेर्‍यात सापडली होती, त्यामुळे योजनेच्या कामाला गती मिळत नव्हती. 1999 पासून योजनेला मुळ प्रशासकिय मान्यता मिळाली होती.

पंरतू दरसुचीतील बदलामुळे वाढ, अपुर्‍या तरतुदीमुळे योजनेच्या किंमतीस मोठी वाढ झाली होती. त्यामुळे शासनाची सुधारीत प्रस्तावात मान्यता आवश्यक होती. आज दि.2 नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार सुलवाडे जामफळ उपसा योजनेच्या 2407 कोटीच्या किमतीस सुधारीत प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात आल्यामुळे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा पाठपुरावा फलदायी ठरणार आहे.

सुलवाडे – जामफळ उपसा योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुलवाडे बॅरेजमधून पाणी पंपाव्दारे उचलून पावसाळयात तापी नदीचे वाहून जाणारे पाणी 120 दिवस उपसा करून त्याव्दारे जामफळ धरण भरण्यात येणार आहे.

त्यासाठी 1294.92 कोटीचा निधी पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असून केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तसा प्रस्ताव देखील पाठविण्यात आलेला आहे.

ना.नितीन गडकरी आणि ना.गिरीश महाजन यांनीदेखील पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना पहिल्या टप्प्यासाठी 1,294 कोटीचा निधी केंद्र सरकारकडून देण्यास सहमती दिली आहे.

त्यासाठी सुधारीत प्रस्तावास मान्यता आवश्यक होती. ती राज्य शासनाकडून प्रदान करण्यात आल्यामुळे केंद्र सरकारचा निधी येण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे.

सुधारीत प्रशासकिय मान्यता मिळालेला 2407 कोटी मधुन 2183 कोटी प्रत्यक्ष योजनेच्या कामावर तर 224 कोटी निधी हा अनुषंगीक कामांवर खर्च करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर पहिल्या टप्प्याचेच काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश देखील शासन निर्णयात नमुद केलेले आहे.

त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील 48 गावांचा सिंचनाचा प्रश्न तातडीने सुटण्यास मदत होणार असून ना.जयकुमार रावल यांनी सुलवाडे जाममळ उपसा योजनेच्या कामासाठी केलेला पाठपुरावा

खर्‍या अर्थाने आज फलदायी ठरला आहे. योजनेच्या कामामुळे कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असा कलंक पुसला जाईल, असा विश्वास ना.जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे.

 

LEAVE A REPLY

*