अक्कलपाड्याचे श्रेय रोहिदास पाटलांचेच – आ.अनिल गोटे

0

धुळे । दि.1 । प्रतिनिधी-अक्कलपाडा प्रकल्पाला विलंब झाला म्हणून रोहिदास पाटील यांना दोष दिला जात होता. मग प्रकल्प पुर्ण झाल्यावर श्रेय त्यांनाच दिले पाहीजे.

धरणावर दोन-चार फुले टाकली म्हणजे माझ्यामुळेच झाले, असे म्हणणे हास्यास्पद आहे, अशा शब्दात केंद्रीय संरक्षण राज्य मंत्र्यांवर टिका करतानाच इंदूर-रेल्वे मार्गाबाबतही आ. गोटेंनी समाचार घेतला आहे.

रेल्वे मंत्रालय, पोर्ट ट्रस्ट, रस्ते बांधकाम (केंद्र) यांची संयुक्त बैठक झाल्या्नंतरच मान्यतेसाठी मंत्रीमंडळापुढे जाईल, तेव्हाच मनमाड-इंदूर रेल्वेचा प्रश्न मार्गी लागेल.

पुढील वर्षी होणार्‍या मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या मार्गाचे भूमीपूजन होईल, असे सांगून कधी रक्षाबंधनाची भेट, कधी भाऊबीजची भेट सांगून चार महिन्यात भूमिपुजन होणार असल्याच्या वल्गना केल्या जातात.

शासकीय प्रकल्प हा काय घरगुती कौटूंबिक प्रश्न असतो काय? असा सवाल आ. अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात उपस्थित केला आहे.

संघटनात्मक जबाबदारी माझ्यावर !
पत्रकात आ. गोटे यांनी म्हटले आहे की, पक्षाने माझ्यावर धुळे शहर विधानसभा मतदार संघाच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी सोपविली.माझ्यासाठी ही आश्चर्याची बाब आहे. खरं तर साक्री मतदार संघाची जबाबदारी मी स्वत: मागितली होती. पण पक्षनेतृत्वाने टाकलेली जबाबदारी आता कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पार पाडेन. कुठलाही कठोर निर्णय घेतांना आपल्यातील दोषांचे सावट निर्णय प्रक्रियेवर पडणार नाही, याची काळजी घेणार आहे.

चंदू चव्हाणचे स्तोम माजविले !
जिल्ह्यातील सैनिक चंदू चव्हाण हा भारताच्या सर्जीकल स्ट्राईकनंतर अचानक सीमा पार करून शत्रू राष्ट्रात गेला हे प्राथमिक अहवालातच स्पष्ट झाले.चंदू धुळे जिल्ह्यातील सुपूत्र आहे.वरिष्ठांशी मतभेद झाल्यामुळे भांडण करून संतापात निघून गेला.पण त्याचेे स्तोम माजवले गेले. चंदूला पक्ष कार्यकत्यांच्या घरोघरी फिरवून ओवाळणी करायला लावायची आवश्यकता होती काय? आता कोर्ट मार्शल झाले.ही लष्करातील अतिशय अवमानास्पद कारवाई आहे, असेही आ. गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

अक्कलपाडाचे श्रेय रोहीदास पाटलांचेच !
अक्कलपाडा धरणाच्या निर्मितीस उशीर झाल्याबद्दल रोहिदास पाटलांना दोष देता ? मग् श्रेयावर तुमचा हक्क कशाला सांगता? विलंबाला रोहिदास पाटील जबाबदार आहेत तर, अक्कलपाडाच्या निर्मितीचे श्रेयही नि:संदीग्ध रोहिदास पाटलांचेचं आहे.धरणांच्या भिंतीवर उभे राहून चार फूल पाण्यात फेकून‘माझ्या मुळेच झाले’ असे म्हणणे जितके हास्यापद तेवढेच अक्कलपाडाचे असल्याचेही आ. गोटे यांनी म्हटले आहे.

सुलवाडे-जामफळसाठी जीवाचे रान केले
सुलवाडे जामफळ कानोली प्रकल्पाच्या प्रश्नावर शिंदखेडा तालुक्यातून पाच -पन्नास शेतकरी भेटायला थेट शासकीय दूध डेअरीवर आले होते. गेल्या सतरा वर्षापासून सुलवाडे -जामफळ कानोली प्रकल्प पडून असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सदर प्रश्नी मी लक्ष घालावे’ असा आग्रह त्यांनी धरला.त्यांना मी जयकुमार रावलांना भेटण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी माझ्या नावाने निवेदन दिल्याने मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले.त्याच काळात पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्यअभियंता पी.व्ही.पाटील यांचा फोन आला. ते मला भेटायला मुंबईस आले.सोबत श्री व्यकंटेशराव नावाचे गृहस्थ होते. सुलवाडे-जामफळ-कानोलीचा प्रश्न शासकीय सेवेत असतांना त्यांनी हाताळला होता. मुख्यमंत्र्याकडे सदर प्रकल्पाचे निवेदन घेवून गेल्यावर त्यांनी ‘तुम्ही लक्ष घाला’असे सांगीतले. पण ‘उगाचच गैरसमज होतात’ असे मी सांगताच ‘काळजी करू नका, माझे पत्र घेवून दिल्लीस जा’ असे त्यांनी सांगितले. उमा भारती यांच्या नावे स्वत:चे पत्र दिल्यानंतर गिरीश महाजन यांनीही पत्र देऊन उमा भारतींना फोन केला. 780 कोटी रूपयांची मूळ प्रशासकीय मान्यता असलेल्या प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता हवी होती. दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळही मिळाली. त्यांनी एकाच शब्दात ‘ठिक है’ सांगितले. त्यानंतर उमाजींनी हा विषय अजेंड्यावर घेऊन मंजूर केला. व्यंकटेशराव यांचा मला अभिनंदनाचा फोन आला. मात्र संरक्षण राज्यमंत्री म्हणून डॉ.सुभाष भामरे तर राज्याच्या मंत्रीमंडळात जयकुमार रावल यांचा कॅबीनेट मंत्रीपदी समावेश झालेला असल्याने श्रेयाचा वाद नको म्हणून मी या प्रकल्पाच्या कामातून बाजूला झालो. कागदपत्रांचा द्राविडी प्राणायामाच्या प्रदीर्घ प्रवासातुन देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांनी सुटका केली नसती तर सदर प्रकल्प इथवर पोहचलाच नसता. प्रकल्पाच्या वाटचालीत आता श्रेयासाठी धडपडणारे तेव्हा मला कुठे कधीच दिसले नाहीत. कुणी माझ्याजवळ साधा नामोल्लेखही केला नाही, असेही आ. गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

गडकरींनीच दिली मान्यता
आता मनमाड इंदूर रेल्वे मार्ग होऊ शकत नाही, असे रेल्वे मंत्रालयातील अधिकार्‍यांनी मला कळविल्यानंतर अखेरीस मी नितीन गडकरी यांच्या लक्षात हा सर्व घटनाक्रम आणुन दिला. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून प्रती वर्षी वाहतुक होणार्‍या 70 हजार कंटेनरपैकी 45 कंटनेरच्या वाहतुकीतून रेल्वेला 760 कोटी रू. मिळतात, हे नितीन गडकरींच्या लक्षात आणून दिले.त्यांनी जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिगीकर यांना अहवाल सादर करायच्या सुचना दिल्या.तीन बैठका झाल्यावर गडकरी यांनी प्रकल्पाला मान्यता दिली. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन मनमाड -इंदूर रेल्वे मार्गासाठीचा नवा समर्थ पर्याय प्रसिध्द केला.

आरओआर कमी कसा ?
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू जिल्ह्यात आले असता अधिकार्‍यांनी 2.5 टक्के आर.ओ.आरचा विषय उपस्थित केला. मी रेल्वे मंत्र्याच्या उपस्थितीतच रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना धारेवर धरले.आर.ओ.आर 11 टक्के असतांना 2.5 टक्के इतका खाली कसा काय जाऊ शकतो, याचा मी स्वत: शोध घेतला. रेल्वे उभारणीचा खर्च अवास्तव वाढवून ‘रेट ऑफ रिर्टन’ अकरा टक्यावरून 2.5 टक्के इतका खाली आल्याचे नितीन गडकरींच्या लक्षात आणून दिले, असेही आ. गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*