जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासातून रोजगाराला चालना !

0

धुळे । दि.1 । प्रतिनिधी-मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील किल्ले लळिंग व सोनगीर, ता. धुळे, साक्री तालुक्यातील भामेर, तर शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील किल्ल्यासह लळिंग कुरण व धबधबा, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेला लांडोर बंगला, आमळी, ता. साक्री येथील अलालदरीचा धबधबा, अनेर अभयारण्य, नागेश्वर पर्यटनस्थळासह विविध ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांमुळे धुळे जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर स्वत:चे अस्तित्व निर्माण करीत आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आगामी काळात गड-किल्लयांच्या विकास होऊन धुळे जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे. यातून रोजगारालाही चालना मिळत आहे.

किल्ले लळिंग : पूर्व- पश्चिम गेलेल्या गाळणा टेकड्यांवर किल्ले लळिंग आहे. किल्ल्याच्या अवशेषांची पडझड झाली आहे. 13 व्या शतकात फारुकी राजवटीत हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. त्यानंतर मोगल, निजाम, मराठे आणि इंग्रजांनी किल्ल्यावर राज्य केले. दुर्गस्थापत्यात मोगल शैलीचा वापर केलेला दिसून येतो. किल्ल्यावर पाण्याची टाकी, धान्य कोठार आहेत. पायथ्यापासून जवळच असलेला लहानसा घुमट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. किल्ले लळिंग पाहून झाल्यावर लळिंगचे कुरण, धबधबा (पावसाळ्यात सुरू असतो.) आणि लांडोर बंगला पाहता येईल. या बंगल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1937 मध्ये काही दिवस वास्तव्य केलेले आहे.

किल्ले सोनगीर : किल्ले लळिंग पाहून झाल्यावर धुळे शहरापासून उत्तरेला मुंबई- आग्रा महामार्गावरच 19 किलोमीटरवर सोनगीर गाव आहे. गावाजवळच सुवर्णगिरी किंवा सोनगीरचा किल्ला आहे. तो अतिशय मोक्याच्या जागी बांधण्यात आला आहे. हा किल्लाही सुरवातीला फारुखी सुलतानांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो मोगल, मराठे आणि नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. 1818 मध्ये तो इंग्रजांनी जिंकून घेतला. गडावर काळ्या पाषाणात बांधलेला गोलाकार बुरुज लक्ष वेधून घेतो. या किल्ल्याच्या अवशेषांचीही पडझड झालेली आहे.

किल्ले भामेर : गिरीदुर्ग प्रकारचा हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासूनची उंची 2500 मीटर आहे. अहिर राजांची राजधानी म्हणून भामेर किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्याने तीन बाजूंनी गावाला वेढले आहे, तर चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या किल्ल्यावर 184 गुंफा आहेत. त्यापैकी काही गुंफा आपल्याला पाहता येतात. किल्ल्याच्या पठारावर पाण्याचे टाके व छोटेस मंदिर आहे. किल्ल्यावरुन परिसराचे दिसणारे विहंगम दृश्य अवर्णनीय आहे. त्यामुळे एकदा किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे, असा हा किल्ला आहे. 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव करीत किल्ल्याचा ताबा घेतला. 1820 मध्ये कालेखानने बंड करुन किल्ल्याचा आश्रय घेतला. त्यानंतर कॅप्टन ब्रिग्जंने भामेर किल्ल्यावरील महत्वाच्या इमारतींची नासधूस करीत कालेखानचा पाडाव केल्याचे उल्लेख इतिहासात उपलब्ध आहेत. या किल्ल्यापासून 27 किलोमीटर बळसाणे येथे अंतरावर जैन धर्मीयांचे प्रसिध्द असे तीर्थक्षेत्र आहे. येथेही देशभरातील जैन धर्मीय मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. या मंदिरात भगवान विमलनाथ यांची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.

थाळनेरचा किल्ला : तापी नदीच्या काठावर शिरपूर तालुक्यात थाळनेर हे बाजारपेठेचे गाव आहे. ते सुरत- बर्‍हाणपूर महामार्गालगत आहे. दिल्लीचा सुलतान फिरोजशाह तुघलक याच्याकडून मलिकवर खान याने थाळनेर व करवंद या परगण्यांची जहागिरी मिळविली. त्याने थाळनेर ताब्यात घेवून फारुकी घराण्याची सत्ता स्थापन करुन 1370 मध्ये थाळनेर येथे त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधला. एका बाजूने तापी नदी, तर दुसर्‍या बाजून तटबंदी आणि बुरुज बांधून किल्ला भक्कम करण्यात आला होता. 1600 मध्ये मोगल बादशहा अकबर याने बहादूरशाह फारुकी याचा पराभव करीत थाळनेरवर ताबा मिळविला. मराठ्यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर निंबाळकर, होळकर घराण्यांनीही या किल्ल्यावर राज्य केले आहे. इंग्रज अधिकारी थॉमस हिस्लॉप याने मराठ्यांचा पराभव करुन तो 1818 मध्ये इंग्रजी राजवटीच्या अंमलाखाली आणला.

थाळनेर किल्ल्यावर राज्य करणार्‍या फारुकी घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची कबरी थाळनेर शहरात आहे. त्यांच्यावर अरेबिक भाषेतील शिलालेख आहेत. यात मलिक राजा (1396), मलिक नसीर (1437), मिरान अदील शाह (1441), मिरान मुबारक खान (1457) यांच्या कबरींचा समावेश आहे. थाळनेर हे गाव शिरपूर चोपडा मार्गावर आहे. येथून जवळच चिंकारांसाठी प्रसिध्द असलेले अनेर अभयारण्य आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सातपुडाच्या डोंगररांगात अनेर नदीवर अनेर धरणाजवळ सुमारे 83 किलोमीटर क्षेत्रात आणि साडेआठ हजार हेक्टर क्षेत्रात अनेर धरण अभयारण्य आहे. चिंकारासाठी हे अभयारण्य प्रसिध्द आहे. अनेर डॅममुळे पाण्याची उपलब्धता आणि जंगल या मुळे या अभयारण्यात विविध 60 प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. धुळे ते शिरपूर 55 किलोमीटर, शिरपूर ते हिसाळे 26 किलोमीटर, तर हिसाळे ते अनेर डॅमदरम्यानचे अंतर 11 किलोमीटर आहे. याच मार्गावर नागेश्वर हे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. पावसाळ्यात हा परिसर विलोभनीय असा दिसतो. येथे नागेश्वर महादेवाचे मंदिर असून, श्रावण महिन्यात येथे यात्रा भरते. मंदिराच्या पायथ्याशी तलाव असून तेथे नौकाविहाराचा आनंद घेता येतो. तसेच बालोद्यानही आहे.

साक्री तालुक्यातील पश्चिमपट्टा हा भात पिकासाठी प्रसिध्द आहे. याच पट्ट्यात साक्रीपासून 37 किलोमीटरवर आमळी गाव आहे. या गावापासून पश्चिमेला दोन किलोमीटरवर अलालदरीचा भाग आहे. तेथे पावसाळ्यात धबधबे कोसळतात. पावसाळ्यात हा परिसर अत्यंत विलोभनीय असा दिसतो. याशिवाय आमळी येथे कन्हय्यालाल महाराजांचे ऐतिहासिक मंदिर आहे. तेथे दरवर्षी कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. खजूर आणि केळीचा प्रसाद यात्रेचे वैशिष्ट्य आहे. साक्री- नवापूर मार्गावर दहिवेल येथे उतरून आमळी येथे जाता येते.

याशिवाय शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील यादवकालीन मंदिर, मुडावद येथील पांझरा आणि तापी नदीचा संगम, पलिकडे कपिलेश्वर मंदिर, याच तालुक्यातील पाटण येथील आशापुरी देवीचे मंदिर, धुळे तालुक्यातील शिरुड येथील प्राचीन कालिका देवी मंदिर प्रेक्षणीय आहे.

पर्यटनस्थळांबरोबरच येथील धार्मिक स्थळे यात्रोत्सवासाठी प्रसिध्द आहेत. यानिमित्त येथे दरवर्षी यात्रोत्सव भरतो. त्यात धुळे येथील श्री एकवीरा देवी, बोरीस येथील सतीदेवी, सोनगीर येथील सोमेश्वर मंदिर, साक्री तालुक्यातील म्हसदी येथील धनदाई देवी, भटाई देवी, गांगेश्वर, शिंदखेडा तालुक्यातील पेडकाई देवी, दत्तवायपूर येथील यात्रोत्सव, विखरण देवाचे येथील यात्रोत्सव, बेटावद येथील जोगाई माता मंदिरात यात्रोत्सव भरतो. याशिवाय शिरपूर येथे खंडोबाची यात्रा भरते. यात्रेत घोडे आणि बैलांचा मोठा बाजार भरतो. तसेच नवरात्रोत्सवाच्या कालावधीत धुळे, बेटावद, शिंदखेडा, शिरपूर, सोनगीर, कासारे येथे रथोत्सव साजरा केला जातो. धुळे जिल्ह्यात उपलब्ध होणार्‍या दळण- वळणाच्या पायाभूत सोयीसुविधा पाहता आगामी धुळे जिल्ह्यातील पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना निर्माण होवून रोजगाराची उपलब्धता वाढणार आहे.

LEAVE A REPLY

*