दंगलीत जाळपोळ: एकास चार वर्षाची शिक्षा

0

धुळे । दि.1 । प्रतिनिधी-शहरात 2008 मध्ये उसळलेल्या दंगलीत मोहाडी परिसरात घरात घुसून जाळपोळ करुन मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी लोटन बाबुराव पाटील, रा.मोहाडी याला चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम.देशपांडे यांनी ठोठावली. तर 16 जणांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, शहरात 2008 मध्ये जातीय दंगल उसळली होती. त्याचे पडसाद 6 ऑक्टोबर 2008 रोजी सकाळी आठ वाजता मोहाडी उपनगरातील दंडेवालेबाबा नगरात उमटले होते.

यावेळी या भागात राहणार्‍या जहीदाबी करीमखान पठाण यांच्या घरात जमावाने अनधिकृत प्रवेश करुन जाळपोळ तसेच कुटुंबियावर प्राणघातक हल्ला केला. यात पठाण यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात भादंवि 407, 436, 452, 146, 147, 148 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा न्यायालयात 17 जणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एम.देशपांडे यांच्यासमोर सुरु झाला. सरकार पक्षातर्फे फिर्यादी,

तपासी अंमलदार ए.जी.पवार व प्रत्यक्षदर्शी यांच्या साक्षी तपासण्यात आल्या. त्या ग्राह्य धरुन न्यायालयाने लोटन बाबुराव पाटील याला दोषी ठरविण्यात आले. भादंवि 436, 452, अन्वये चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवसाची कैद, कलम 452 अन्वये तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, 500 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 30 दिवस कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

तर पुराव्या अभावी संतोष आनंदा गवळीसह 16 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.अजय सानप यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड.राजेंद्र गुजर यांनी काम पाहिले. सन 2008 मधील दंगलीच्या खटल्यातील हा पहिला निकाल लागला. या निकालाकडे शहरवासियांचे लक्ष लागले होते.

LEAVE A REPLY

*