प्रशासन आणि अतिक्रमणधारकांमधील चर्चा ठरली निष्फळ

0

धुळे । दि.31 । प्रतिनिधी-रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर विस्थापितांचे आंदोलन तीव्र होतांना दिसत आहे. मनपा प्रशासन आणि अतिक्रमणधारक यांच्यात सकारात्मक चर्चा होवून कोणताही मार्ग निघत नसल्याने या आंदोलनामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

48 तासांपासून सुरु झालेले हे आंदोलन मिटविण्यात मनपा प्रशासनाला अद्यापही यश मिळालेले नाही. तर पोलिस प्रशासन मात्र या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देवून असून आंदोलन चिघळू नये व सांमजस्यातून तोडगा निघावा, यासाठी प्रयत्न करीत असताना दिसत आहे.

डिवायएसपी हिमतराव जाधव यांच्यासह तहसीलदार ज्योती देवरे यादेखील आज या ठिकाणी बर्‍याच वेळेपर्यंत तळ ठोकून होत्या. महापौर आणि आयुक्त यांच्यासमवेत अतिक्रमणधारकांची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु आपण केलेल्या मागण्यांवर विचार होत नसल्याचे लक्षात आल्यावर अतिक्रमणधारकांनी ही चर्चा अर्धवट सोडली.

मनपा अधिकारी, पोलिस विभागाचे अधिकारी आणि अतिक्रमणधारक यांच्यात चर्चा होवून पर्याय निघाल्याशिवाय हे आंदोलन संपण्याची चिन्हे दिसत नाही. अतिक्रमणधारक आपल्या मागण्यांवर ठाम असून जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

महिला, पुरुष आपल्या चिमुकल्यांसह मनपाच्या प्रवेशद्वारासमोर तळ ठोकून आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत.

मात्र, अतिक्रमणधारक आणि प्रशासन यांच्यातील चर्चेतून तोडगा काढण्यात यावा व आंदोलन संपविण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अतिक्रमणधारक ठाम- रेल्वेस्टेशन रोडवरील 222 अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढण्यात आले.यासाठी अतिक्रमणधारकांना तात्काळ दसेरा मैदानातील भूखंडात जागा द्या, या मागणीसाठी अतिक्रमणधारकांनी मनपा प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले आहे.

अतिक्रमणधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर जाधव, तहसीलदार ज्योती देवरे, डीवायएसपी हिम्मतसिंग जाधव यांची बैठक बोलविण्यात आली होती. मात्र अतिक्रमणधारक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने बैठक होवू शकली नाही. तर आजपासून अतिक्रमणधारकांनी अमरण उपोषणाला बसले आहेत.

वाहनांसाठी मोकळा केला मार्ग- गेल्या दोन दिवसापासून अतिक्रमणधारकांनी आपल्या मागण्यासाठी मनपा प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे मनपा आयुक्त सुधाकर जाधव व महापौर कल्पना महाले यांची वाहने मनपा आवारातच होती.

मागण्या मान्य होईपर्यंत संबंधित वाहने मनपा आवारातून बाहेर पडू देणार नाहीत, अशी भुमिका अतिक्रमण धारकांनी घेतल्याने महापौर व आयुक्तांना खाजगी वाहनाने बाहेर पडावे लागले होते.

आज पोलिसांच्या मदतीने वाहनांसाठी मनपा प्रवेशद्वाराचा मार्ग मार्ग मोकळा करून महापौर व आयुक्तांची वाहने बाहेर काढण्यात आली. त्यानंतर आयुक्त व महापौर मनपात त्यांच्या वाहनांनी दाखल झाले.

 

LEAVE A REPLY

*