नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-जम्मू- काश्मीरमधील बांदीपुरा येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले भारतीय वायुदलाच्या गरुड पथकातील जवान मिलिंद किशोर खैरनार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी बोराळे, ता. नंदुरबार येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू मनोज खैरनार यांनी शहीद मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.

जम्मू- काश्मीरमधील बांदीपुरा येथे दहशतवाद्यांशी लढताना बुधवारी मिलिंद खैरनार शहीद झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी ओझर, जि. नाशिक येथील विमानतळावर आणण्यात आले. यावेळी वायुसेनेच्या जवानांनी मानवंदना दिली.

त्यानंतर पार्थिव आज सायंकाळी बोराळे या त्यांच्या गावी आणण्यात आले. मिलिंद खैरनार यांचे पार्थिव सुरवातीला त्यांच्या घरी आणण्यात आले. तेथे ग्रामस्थांनी अंतिम दर्शन घेतले.

त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. भारतीय वायुदलाच्या जवानांनी शहीद मिलिंद खैरनार यांना मानवंदना दिली. यावेळी शहीद मिलिंद खैरनार यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

पालकमंत्री ना.रावल यांनी यावेळी शोक भावना प्रकट केल्या ते म्हणाले, शहीद जवान मिलिंद खैरनार हा नंदुरबारला अभिमान वाटेल एवढ्या मोठ्या पदावर पोहचला होता.

परंतु त्यांचा वीर मृत्यू झाला या घटनेने जिल्ह्यासह संपुर्ण देशाला
दु:ख आहे. शहीद जवान मिलिंद खैरनार यांनी देशासाठी केलेल्या त्यागातून देशप्रेमाची प्रेरणा मिळेल असेही त्यांनी सहवेदना प्रकट करतांना सांगितले.

सकाळपासूनच शहीद जवान मिलिंद खैरनार याच्या पार्थिवाची गावकरी वाट पाहत होते. जिल्ह्यातील अनेक गावांमधून मिलिंदच्या अंतिम दर्शनासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सायंकाळच्या सुमारास मावळत्या सूर्याच्या साक्षीने मिलिंद खैरनार याच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*