पांझरा दुथडी वाहिली; फरशी पुलावरील वाहतूक थांबवली

0

धुळे । दि.12 । प्रतिनिधी-परतीच्या पावसाने शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला असून सलग तिसर्‍या दिवशी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.

तर तब्बल एक वर्षानंतर पांझरा नदी दुथडी वाहतांना शहरवासियांना दिसून आली. पांझरा नदीत अक्कलपाडा प्रकल्पातून साडेपाच हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.

कालिकामाता मंदिरा जवळील फरशी पुलावरुन पाणी गेल्यामुळे वाहतुकीसाठी दुपारपासून पुल बंद करण्यात आला आहे. तर सतर्कता म्हणून लहान पुलावरील वाहतूकही रात्री बंद करण्याची सूचना आपत्ती विभागाने दिली आहे.

जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने कहर केला आहे. मंगळवारी रात्रभर पावसाने झोडपून काढले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

काहीतास उघडीप दिल्यानंतर बुधवारीही पाऊस झाला. आज सकाळपासून उन-सावलीचा खेळ सुरु होता. दुपारनंतर वातावरणात बदल झाला.

सायंकाळी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह साडेपाच वाजेनंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पावसाने शहराला झोडपून काढले. शहरासह परिसरातही पाऊस झाला.

परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला कापूस भिजला असून बोंडही गळून पडले आहे. ज्वारी, बाजरी, मक्याचे पिके अनेक ठिकाणी आडवी झाल्याने वाया गेल्यात जमा आहे.

वीज कोसळली – शहरातील बसस्थानकाच्या आवारातील एका झाडावर आज सायंकाळी वीज कोसळली. यात जीवितहानी झालेली नाही, असे आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले.

पांझरेला पूर – पांझरा नदीच्या उगमस्थानावर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पांझरा नदीला पूर आला. त्यातच अक्कलपाडा धरणातून पांझरेत साडेपाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे तब्बल एक वर्षानंतर पांझरा नदी दुथडी वाहतांना शहरवासियांना दिसून आली आहे.

फरशी पूल बंद – शहरातील शिवाजी रोडवरील कालिका माता मंदिराजवळ फरशी पूल बांधण्यात आला आहे. पांझरा नदीला पूर आल्यामुळे या फरशी पुलावरुन पाणी गेले आहे. त्यामुळे आपत्ती विभागाने पोलिस यंत्रणेनेला फरशी पुलावरील वाहतूक बंद करण्याबाबत सूचना दिली. त्यानुसार फरशी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. या पुलाच्या दोन्ही टोकांना बॅरिकेटस लावण्यात आली. तसेच पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

लहान पुलावरुन पाणी जाण्याची शक्यता – पांझरा नदीत पुराचे पाणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे सदर पुराचे पाणी लहान पुलाला रात्री स्पर्श करण्याची शक्यता आहे. यामुळे सतर्कता म्हणून लहान पुलावरुन वाहतूकही बंद करण्याची सूचना आपत्ती विभागाने पोलिस यंत्रणेला दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सामोडे परिसरात पाऊस हजेरी लावत असल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

सामोडे परिसरात पाऊस
साक्री तालुक्यातील सामोडे परिसरात काल झालेल्या पावसाने परिसरातील सोयाबिन, बाजरी, मका पिकांचे नुकसान झाले. हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयोगात पडणार आहे. मात्र खरीप हंगामाची पिके यामुळे वाया जावू शकतात. असा अंदाज शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहे.

LEAVE A REPLY

*