काश्मीरमध्ये बोराळ्याचा सुपुत्र शहीद

0

नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी-काश्मिरमधील बांदीपोर येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीत जिल्हयातील बोराळे (ता.शहादा) येथील हवाई दलाचे जवान मिलींद किशोर खैरनार (वय 34) हे शहिद झाले आहेत. त्यांच्यावर उद्या दि. 12 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बांदिपोरामधील हाजिन भागात आज पहाटे पावणे पाच वाजेपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु होती. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले.

यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

यात दोन दहशतवादी ठार झाले. मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवानांना वीरमरण आले. यात नंदुरबार जिल्हयातील बोराळा (ता.शहादा) येथील मिलिंद किशोर खैरनार (वय 34) यांचा समावेश आहे. कै.खैरनार हे हवाई दलाच्या ‘गरुड’ या विशेष पथकात कार्यरत होते.

निलेशकुमार नायर यांनादेखील दहशतवादी हल्लयात वीरमरण आले. त्यांच्यावर उद्या दि. 12 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत लष्करी इतमामात बोराळे ता.शहादा या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सुस्वभावी मितभाषी ‘मिलिंद’
वीर जवान मिलिंद खैरनार यांचे वडील साक्री येथील वीज मंडळात वरिष्ठ उपकेंद्र चालक म्हणून नोकरीस होते. तेथून ते निवृत्त झाले. त्यानंतर नाशिक येथे त्यांचे वास्तव्य आहे. मिलिंद एक आदर्श विद्यार्थी म्हणून साक्रीमध्ये परिचित होता. आपला मुलगा सैन्यदलात देशाची सेवा करीत असल्याचा अभिमान वडिलांना वाटायचा. सुस्वभावी, मितभाषी आणि समाजप्रिय व्यक्तीमत्व म्हणून मिलिंदने शाळा-महाविद्यालयीन जीवनातच आपली ओळख निर्माण केली होती. साक्रीकरांच्या प्रत्येक सुखदुःखात मिलिंद स्वतः साक्रीत असेपर्यंत सहभागी व्हायचा. शहरातील कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, शारदीय व्याख्यानमाला, आध्यात्मिक उपक्रम, वारकरी संप्रदाय, कीर्तन, प्रवचने यामध्ये सहभागी होवून मित्रमंडळीमध्ये अतुट नाते निर्माण करायचा. मी वीज वितरण कंपनीत असल्याने मिलिंद यांच्या कुटुंबाशी निकटचा संपर्क होता. स्नेहपूर्ण नाते जोपासणारा देशाचा हा वीर जवान आज वीर मरण पत्करुन साक्रीकरांना शोकसागरात सोडून गेला आहे. हा आमच्यासाठी अतिशय दुःखद प्रसंग आहे. मिलिंदची आठवण साक्रीकरांना कायम येत राहील. अशा शब्दात वीज वितरण कंपनीतील वीज वर्कस फेडरेशनचे सचिव किरण नांद्रे यांनी मिलिंद खैरनार यांच्या व्यक्तीमत्वाची आठवण सांगितली.

मृत्यूला न घाबरणारा जवान
आयुष्यात कधीच चेहर्‍यावर नाराजी नाही. डोळ्यांमध्ये कसलेही भय नाही आणि मनात मृत्यूची कधी भिती नाही. अशी ओळख असलेला माझा बालपणीचा मित्र देशासाठी सेवा करतांना शहीद झाला. वीर मरण प्राप्त झालेल्या मिलिंद खैरनार यांच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर आहेत. माझा बालपणीचा मित्र आज हरपला आहे. अशा शब्दात शहीद मिलिंद खैरनार यांचे नाशिक येथील वर्गमित्र राजकुमार कुवर यांनी मिलिंद खैरनार यांच्या आठवणींना उजाळा दिला. मिलिंद बालपणापासून अतिशय हुशार होता. नाविन्याचा त्याला ध्यास असायचा. त्यामुळे सैन्यदलाच्या गोष्टी वाचायला लागल्यापासून वायुसेनेत जाण्याचा निर्णय त्याने घेतलेला होता. आमच्याशी गप्पा करतांना त्याचे ध्येय स्पष्ट व्हायचे. ते ध्येय त्याने आयुष्यात साध्य केले. तो अत्यंत मितभाषी आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा होता. सैन्यदलात दाखल झाल्यानंतर तो नाशिकला यायचा. तेव्हा आम्ही सगळे मित्र जमा व्हायचो. त्याचे तिकडचे फोटो दाखवायचा, ते पाहून आमच्या चेहर्‍यावर काहीसे भय निर्माण व्हायचे. परंतु मिलिंद असा एक माणूस होता, तो मृत्यूला कधीच घाबरत नव्हता. त्याच्या डोळ्यात कधीच भय नव्हते. मी बालपणाचा मित्र असल्याने मिलिंदची पूर्ण वाटचाल पाहिलेली आहे. नाशिकलाही आम्ही एकाच परिसरात राहतो. नाराजी त्याच्या चेहर्‍यावर आयुष्यात कधीच दिसली नाही. मिलिंदला नाराज राहणे ही गोष्टच कधी आवडत नव्हती. सदर प्रसन्न आणि आनंदी असे त्याचे व्यक्तीमत्व होते. मिलिंदचे नसणे आमच्यासाठी अतिशय दुःखदायक वेळ आहे. अशा शब्दात शहीद मिलींद खैरनार यांचे बालमित्र राजकुमार कुवर यांनी आठवणींना उजाळा दिला. राजकुमार कुवर हे नाशिक येथील संदीप फौउंडेशनमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राजकुमार आणि मिलिंद या दोघांचे वडील एमएसईबीत साक्री येथे अनेक वर्ष एकत्र सेवेत होते. त्या दिवसापासूनची मैत्री मिलींदने कायम जोपासल्याचे कुवर सांगतात.

साक्रीकरांशी होते जिव्हाळ्याचे नाते
वीरमरण प्राप्त झालेले मिलिंद खैरनार हे शहरातील न्यू इंग्लिश स्कुल येथे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले होते. शहीद मिलिंद यांचे वडील किशोर सदाशिव खैरनार हे साक्री वीजवितरण कंपनीत कार्यरत होते. त्यांनी तालुक्यात एकूण 36 वर्ष सेवा केली. येथील 132 के व्ही उपकेंद्रात 19 वर्षापर्यंत ‘सिनियर ऑपरेटर’ म्हणून कार्यरत होते. 2013 मध्ये सेवा निवृत्त झाल्यानंतर किशोर खैरनार नाशिक येथे परिवारासोबत स्थायिक झाले आहेत. शहीद मिलिंद खैरनार यांचे 5 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले होते. शालेय जीवनात ते अतिशय हुशार होते तसेच त्यांना विज्ञान विषयाची आवड होती. याचबरोबर क्रिकेट व कबड्डी या खेळातही पारंगत होते. विद्यार्थी दशेतच त्यांना देशासाठी कार्य करण्याची धडपड होती. मिलिंद यांच्या या विचारांमुळेच त्यांनी भारतीय सेनेत नोकरी करून देशसेवा करण्याचे ध्येय ठरविले होते. म्हणून त्यांनी त्याच दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवत साक्री येथे वास्तव्य असतानाच 2002 मध्ये भारतीय सेनेत भर्ती झालेत. त्यांचे लग्न धुळे येथे 2009 साली झाले. त्यांचे सासरे देवपूर, धुळे येथील असून बांधकाम विभागात सेवेत आहे.

मिलिंद यांचे वडील साक्रीला एमएसईबीत नोकरीला असल्याने मिलिंद यांचा जन्म साक्रीतच झाला आणि 12 वीपर्यंतचे शिक्षण त्यांनी साक्रीतच पुर्ण केले. त्यानंतर धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात मिलिंद यांनी कॉम्प्युटर सायन्सच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. तेथे शिकत असतानाच त्यांनी एअरफोर्समध्ये भरतीसाठी अर्ज केला आणि भरतीही झाले. त्याचवेळी केंद्र शासनाने गरूडा कमांडोची स्थापना केली. त्यात मिलिंद यांची निवड झाली. वयाच्या 18 व्या वर्षी एअरफोर्समध्ये दाखल झालेले मिलिंद यांनी मुंबईतील 26/11 च्या अतिरेकी हल्ल्याप्रसंगी एनएसजी टीमसमवेत मोठी कामगिरी बजावली होती. त्यावेळच्या पथकात एनएसजीचे 170 व गरूडा कमांडोचे 30 अशा 200 जवांनाचा समावेश होता.

ना.रावल यांची बोराळे येथे भेट
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास बोराळे येथे भेट दिली. त्यांनी शहिद मिलिंद खैरनार यांचे काका तुकाराम खैरनार यांचे सांत्वन केले. तसेच उद्या होणा-या लश्करी इतमामातील अंत्यसंस्काराचा प्रशासनाकडून आढावा घेतला.

आज दुपारी अंत्यसंस्कार
दरम्यान शहीद मिलिंद यांचे पार्थीव उद्या दि. 12 रोजी दुपारी दीड वाजेपर्यन्त बोराळे येथे आणण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता विमानाने ओझर येथे येणार आहेत. तेथून अँम्बुलेन्सने बोराळे येथे आणले जाणार आहे. दुपारी दीड वाजता शहिद मिलिंद यांच्यावर लश्करी इतमामात अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*