धुळे जिल्ह्यात पावसामुळे लाखोंचे नुकसान

0

धुळे । दि.11 । प्रतिनिधी-शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. यामुळे खरीपाची पिके जमिनदोस्त झाली असून कापूस पिक शेतकर्‍याच्या हातून गेले आहे.

कांदा, भुईमूग, बाजरी, मका या पिकासह फळबागांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. शहरात घरांची पडझड झाली आहे तर जनावरेही मृत्यूमुखी पडले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 641 मिमी पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. काल दि.10 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीपासून पावसाचा जोर जास्त होता. संपुर्ण रात्रभर शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.

शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 6 च्या मैदानाजवळ भररस्त्यात वृक्ष उन्मळून पडले. यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. शाळांच्या मैदानांवर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी आल्या.

मंगळवारी बाजाराचा दिवस असल्यामुळे व्यापार्‍यांनी खरेदी केलेला कांदा पथारीवर टाकलेला होता. तो कांदाही पाण्याखाली गेला. तसेच शेती मालाचेही नुकसान झाले आहे. बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर पाणी साचल्यामुळे शेतकर्‍यांना माल आणण्यासाठी तारांबळ करावी लागली. बाजार समितीच्या आवारालाही तळ्याचे स्वरुप आले होते.

घरांची पडझड
शहरातील जुने धुळे परिसरात राहणारे मोतीलाल शामराव फुलपगारे यांच्या मालकीच्या घराची भिंत पडल्याने संसारोपयोगी वस्तुंसह धान्याचे नुकसान झाले आहे. तर याच भागात राहणारे नंदलाल महारु फुलपगारे यांच्या घरासमोरील दर्शनी भागातील जिना कोसळला. तसेच घरावरील पत्रा वादळाने उडून गेला आहे.

लाखोंचे नुकसान
जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी कपाशीचा पेरा केलेला होता. यंदा कापसाचे उत्पादन चांगले झाले होते. परंतु परतीच्या पावसामुळे कापूस पीक पाण्याखाली गेल्यामुळे कापसाचे बोंड खराब झाले आहे. कापूस उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तर खरीपाचे पिके वादळी वारा व पावसामुळे जमीनदोस्त झाली आहे. कांदा, कापूस, भुईमूग, बाजरी, मका या पिकांसह फळबागांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

धुळे तालुका
धुळे तालुक्यातील बोरीस, लामकानी, रामी, बेहेड, नाणे, सीताने, नेर, रानमळा या भागालाही मुसळधार पावसाने रात्री झोडपून काढले. या भागातील शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे खरीपाची पिके पाण्याखाली गेली आहेत. तर तिसगांव- ढंढाणे गावांच्या मधुन कापडण्याकडे वाहणार्‍या भात नदीच्या फरशीवरुन सुमारे 15 तास पाणी वाहिल्यामुळे तिसगाव, वडेल, रामनगर, हनुमंतवाडी यासह अन्य गावांचा संपर्क तुटला होता.

साक्री तालुक्यात पाऊस
साक्री तालुक्यात देखील वादळी वार्‍यासह पाऊस झाला आहे. तालुक्यातील हट्टी खुर्द, रामनगर, घाणेगाव, दुसाने या गावांना पावसाने झाडपून काढले आहे. पावसाच्या फटक्यामुळे सुमारे 250 मेंढ्या, बकर्‍या, गायी व म्हशी मृत्यूमुखी पडल्या आहेत.

पिंपळनेर येथे देखील मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, नागली, भात पिकांचे नुकसान झाले आहे. या परिसरातील सर्व जलाशय पुर्ण क्षमतेने भरली आहेत.

शिरपूर तालुका
शिरपूर शहरासह तालुक्यालाही पावसाने रात्री झोडपून काढले. आज सकाळी 6 वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. या तालुक्यातील जलाशय पुर्ण क्षमतेने भरले आहेत.

शिंदखेडा तालुका
शिंदखेडा शहरासह तालुक्यात पाऊस झाला. पाणी पुरवठा करणारा कोल्हापूर टाईप बंधारा बुराई नदीला आलेल्या पुरामुळे ओव्हर फ्लो झाल्याने पूर्वेकडील मातीचा भराव वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

*