बामखेडा परिसरात जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान

0

बामखेडा, ता.शहादा । दि.10 । वार्ताहर-बामखेडासह परिसरातील वडाळी, जयनगर कोंढावळ, तोरखेडा, फेस, खैरवा, भडगाव आदी भागात आज परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व मका पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. हाती आलेले पीक पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

या हंगामात 12 जूनला पहिला पाऊस आला. त्याच्या भरवशावर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर सुमारे एक महिना पाऊस रूसून बसला होता. या एक महिन्याच्या खंडामुळे अनेक शेतकर्‍यांना काही भागात दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्रात पिकांना पोषक पाऊस पडला.

चांगल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली. मात्र मघा आणि पूर्वा नक्षत्राच्या मध्यांतरात पावसाने पुन्हा दडी मारली. परिणामी एक महिन्याच्या खंडामुळे पिकांच्या वाढीवर चांगलाच परिणाम झाला होता. काल देखील मुसळधार पावसाचे दुपारी 1 वाजेपासून जोरदार आगमन झाले.

त्यामुळे कापूस, मका व सोयाबीन या काढणीवर आलेल्या पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. लवकर वाढ होणार्‍या सोयाबीनला आता पावसामुळे कोंब फुटू लागले आहेत.

काही शेतामध्ये मका व सोयाबीनची व कापणी करून त्याचे ढिगारे उभे करण्यात आले असताना कालच्या पावसाने तर शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले आहे.

सततच्या पावसामुळे कापलेले मका व सोयाबीनही खराब होतांना दिसून आले आहे. कापसाच्या एका झाडावरील किमान दहा ते बारा बोंडांना बुरशी चढली आहे.

त्यामुळे कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.पावसामुळे शेतातील सखल भागात पाणी साचले आहे.सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटले आहेत.

परतीच्या पावसाने ऐन कापणी हंगामातच मका व सोयाबीनचे मोठे नुकसान केल्याचे बोलले जात आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अतिपावसामुळे कपाशीच्या बोंडावर बुरशी चढली आहे. खरिपातील पावसाचा रब्बीला फायदा होणार आहे. सततच्या पावसाने व वातावरणामुळे पिकांना सूर्यकिरण मिळेनासे झाले.

त्यामुळे फुटणीस आलेली बोंड सडलेली आहेत. बहुतांश शेतकर्‍याचे एकरी एक ते दोन क्विंटल कापसाच्या उत्पादनाची नासाडी झाली आहे.

मात्र या पावसामुळे जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रब्बी पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. भूजल पातळी वाढण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल अशी चर्चा आहे. परिसरात कालच्या पावसामुळे शेतक-याचे पिकांचे नुकसान होवून परीसरातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे, यात मात्र शंका नाही.

कळंबू परिसरालाही पावसाचा तडाखा

कळंबूसह परिसरात आज दुपारी पावसाने झोडपून काढले. सध्या खरीप हंगामाची कामे जोमात सुरू आहेत. यामध्ये कापूस वेचणी, बाजरी कापणी, पावसाळी भुईमूग काढणीमुळे शेतकरी वर्गाची धांदल उडाली आहे. त्यातच दुपारपासून बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाचा तोंडाजवळ आलेला घास वाया जाण्याची भिती शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. पांढरे सोने समजला जाणार्‍या कापूस या बुरशी सारख्या रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पादन घट झाली आहे तर यावर्षी सुरूवतीपासूनच कापसाला 3800 ते 4 हजारपर्यंत कमी भावामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अवकाळी पावसामुळे काही शेतकर्‍यांनी बाजरी कापणी केली आहे ती खळयात पडून असल्याने कणसेमध्ये बुरशी व कोंब फुटत आहे तर कापसाचे झाडावरच फुटलेला कापूस ओला झाला तर झाड हे जमिनदोस्त उपटून शेतकरी वर्ग घरी आणून तोडणी करतांना दिसून येत आहे. कळंबू परिसरात कापूस या पिकांवर पडलेल्या लाल्या रोगाचा पंचनामाकरून शासन स्तरावरूणन मदत करावी अशी मागणी कळंबू परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*