निधी द्या, 200 खाटांचे रुग्णालय सुरु करा !

0

धुळे । दि.10 । प्रतिनिधी-शहरातील सर्वोपचार रुग्णालय शहरापासून आठ कि.मी. अंतरावर शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दोन वर्षापुर्वी स्थलांतरीत झाले आहे.

ग्रामीण जनतेच्या दृष्टीने आणि शहरवासीयांसाठी देखील सद्याचे सर्वोपचार रुग्णालय लांब अंतरावर आहे. त्यामुळे रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागत असून शहरातील बंद पडलेले जुने जिल्हा रुग्णालय सुरु करण्याठी तीन कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून 200 खाटांचे सर्वोपचार रुग्णालय याठिकाणी सुरु करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे आज करण्यात आली.

माजी आ.शरद पाटील सोबत शिवसेना जिल्हाध्यक्ष हिलाल माळी, बापूदादा शार्दुल, अतुल सोनवणे, भुपेंद्र लहामगे, संजय गुजराथी, पंकज गोरे, किरण जोंधळे, सिध्दार्थ करनकाळ आदी यावेळी उपस्थित होते.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2012-13 च्या बृहत आराखड्यानुसार जुन्या जिल्हारुग्णालयाच्या जागी शंभर खाटांचे जिल्हारुग्णालय व शंभर खाटांचे महिला रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे.

यासाठी 307 पदे मंजुर झाली असून त्यातील 70 महिला परिचारीका धुळे रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. सध्या हे कर्मचारी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सेवा देत आहेत.

जुन्या जिल्हा रुग्णालयाची इमारत सध्यस्थितीत पडून असल्याने ती वापरण्यायोग्य आहे किंवा नाही याचा अहवाल शासनाने मागविला होता.

इमारतीची किरकोळ दुरुस्ती केल्यानंतर इमारत उपयोगात येवू शकते असे बांधकाम विभागाने सुचित केले आहे. त्यानुसार रुग्णालय दुरुस्तीसाठी दोन कोटी 73 लाखांपेक्षा जास्तीचा निधी आवश्यक आहे.

सध्या या इमारतीची दूर्दशा सुरु झाली असून खिडक्या, पंखे मोडकळीस आलेले आहेत. शिवाय ऑपरेशन थिएटर व शौचालय, बाथरुमची दुरावस्था आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

सदरचे जिल्हा रुग्णालय पुर्ववत सुरु होईपर्यंत शवविच्छेदन रुमकडील भिंत बंद करून होणार्‍या चोर्‍या थांबवाव्यात. याठिकाणी आवारात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची गस्त सुरु करावी. सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*