अक्कलपाडा पाणीसाठ्यामुळे 400 एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

0

धुळे । दि.10 । प्रतिनिधी-निम्न पांझरा अर्थात अक्कलपाडा प्रकल्पात यावर्षी प्रथमच 70 टक्के पाणी साठा करण्यात आला मात्र साठवलेले हे पाणी संपादित न केलेल्या 350 ते 400 एकर शेत जमीनीत गेल्याने सर्व पिके नष्ट झाली असून शेकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी अधिकार्‍यांसह पुनर्वसित सैय्यदनगर गावाला भेट दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्कलपाडा प्रकल्पासाठी 1991-92 साली एकूण लागणार्‍या जमीनीचा सर्व्हे करण्यात आला होता.

त्यानुसार अक्कलपाडा, वसमार, सैय्यदनगर,इच्छापूर,तामसवाडी धमनार, दातर्ती या गावातील शेतकर्‍यांच्या शेतजमीनी संपादित केली होती.

परंतू यावर्षी प्रथमच 70 टक्के पाणी साठा केला असता संपादित न केलेल्या 350 ते 400 एकर जमीनीत पाणी घुसले. परिणामी त्या क्षेत्रातील सर्व पिके नष्ट झाली.

शिवाय सैय्यदनगरहून जाणारा शिवार रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्‍यांचा शेतात जाणारा मार्गच बंद झाला. महावितरणाचा एक ट्रान्स्फार्मर पाण्यात आल्यामुळे त्या ट्रान्स्फार्मरवरील सर्व विद्युत कनेक्शन काढल्यामुळे बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले या सर्व प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले त्यांनी अक्कलपाडा संघर्ष समितीचे नेते सुभाष काकुस्ते, अक्कलपाडा सरपंच श्रीराम कर्वे, उपाध्यक्ष गुलाबराव चव्हाण यांच्याकडे दाद मागितली त्यानुसार आ.कुणाल पाटील यांच्याशी संपर्क साधला.

आ.पाटील यांनी सैय्यदनगर गावात शेतकर्‍यांशी संवाद साधून नुकसान झालेल्या शेतीची पहाणी केली यावेळी कॉ.सुभाष काकुस्ते श्रीराम कर्वे, उपाध्यक्ष गुलाब चव्हाण, रामदास सोनू पाटील, अक्कलपाडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री बडगुजर, अभियंता श्री गरूड, पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, भाईदास पाटील, निंबा पाटील, बारकू पाटील, सुपडू पाटील, भरत नेरे, दिपक देवरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी निवासी जिल्हाधिकारी अतुर्लीकर यांच्याशी मोबाईलव्दारे संपर्क साधुन तातडीने कृषी व महसूल विभागाकडून नुकसानीचा संयुक्त पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच जलसंपदा विभागाने तातडीने जीपीएस सर्व्हे करून एकूण किती शेती संपादीत होणार आहे त्याचा तपशील सादर करण्याचे सांगितले.

संपादित नसलेल्या शेतजमीनीत पाणी गेल्यामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळवून देवू असे आ.कुणाल पाटील यांनी शेतकर्‍यांना आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

*