मुलाच्या आत्महत्येमागील संशयीत अद्यापही मोकाट कसे ?

0

धुळे । दि.10 । प्रतिनिधी-साहेब…आमच्या मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत असणार्‍यांवर, पाठपुराव्यानंतरही तब्बल 35 दिवस गुन्हा दाखल झाला नाही.

त्यानंतर गुन्हा दाखल होऊन 16 दिवस उलटले तरीही संशयितांना अटक झाली नाही. मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत असणारे त्याची पत्नी, सासरे व आजल सासरे यांना त्वरीत अटक करा, एवढे दिवस संशयीतांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यावर कार्यवाही करा व त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपास करा, अशा आशयाचे निवेदन येथील मयत ज्ञानेश्वर बडगुजरचे आई, वडील, भाऊ व ग्रामस्थांनी आज (दि.9) दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर व जिल्हा पोलीस प्रमुख एम.रामकुमार यांना निवेदन देतांना मयताचे वडील अशोक बडगुजर, आई चंद्रकलाबाई बडगुजर, भाऊ अमोल बडगुजर यांना रडु कोसळले.

यासंदर्भात येत्या तीन दिवसात कारवाई करण्याचे निर्देश द्या. अन्यथा दि.13 ऑक्टोंबरपासुन रोज कापडणे व धुळे येथे पोलीस प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढणे- पुतळा दहन करणे, मुक मोर्चा काढणे, लाक्षणिक उपोषण करणे, घंटानाद आंदोलन करणे, आमरण उपोषण करणे आदी स्वरुपातील आंदोलने रोज केली जातील याची दखल घ्यावी असाही इशाराही यावेळी देण्यात आला.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आमचा मुलगा नामे ज्ञानेश्वर उर्फ मयुर अशोक बडगुजर (वय 28) याने दि.18 ऑगष्ट 2017 रोजी सकाळी 9 ते 9:30 च्या दरम्यान कापडणे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी मयत ज्ञानेश्वरने चिठ्ठी (सुसाटीत नोट) लिहुन ठेवल्याची पोलीसांनी आढळली. यात मयताने आपल्या पत्नीसह, सासरे व आजल सासरे यांच्या धमकीला कंटाळुन आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.

या चिठ्ठीच्या आधारे सबंधितीतांवर गुन्हे दाखल होऊन कायदेशिर कार्यवाही होणे आवश्यक होते. परंतू यात संशयितांना कारण नसतांना 35 दिवसांची मोठी मोकळीक दिली गेली.

आमच्या मुलाच्या आत्महत्येनंतर आम्ही सतत पाठपुरावा करुनही सोनगीर पोलीसांनी तब्बल 35 दिवस साधा गुन्हाही दाखल केला नाही. दि.23 सष्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर आज 16 दिवस उलटले तरीही संशयीतांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणात आम्हाला अर्थपूर्ण तडजोडीचा संशय असुन संशयितांना अटकपूर्ण जामिन मिळण्यासाठी ही बोटचेपी भूमिका घेतली जात असल्याचे दिसते.

यात संशयितांना तात्काळ अटक करत त्यांना पाठीशी घालणार्‍या सोनगीर पोलीसांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच हा तपास त्रयस्थ यंत्रणेकडे सोपविण्यात यावा, अशीही आमची मागणी आहे.

मयत ज्ञानेश्वरचे आत्महत्येपूर्वी सुमारे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते, तर दोन महिन्यापासुन पत्नी माहेरी होती. या चिठ्ठीत मयताने आपली पत्नी हर्षदा ज्ञानेश्वर(अरविंद) बडगुजरसह सासरे अरविंद मोतीलाल बडगुजर व आजल सासरे मोतीलाल बारकु बडगुजर रा.साळवे यांच्या धमकिला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

याबाबत सखोल चौकशी करुन सबंधितांवर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी सोनगीर पोलीसांत आम्ही व ग्रामस्थांनी केली होती.

परंतू आमच्या मुलाच्या या आत्महत्येच्या घटनेकडे सोनगीर पोलीसांनी अक्षम्य दुर्लंक्ष केल्याचे दिसते. या प्रकरणात संशयितांवर तब्बल 35 दिवस गुन्हा दाखल न करणे, दाखल झाल्यानंतर 16 दिवस उलटल्यावरही संशयित आरोपींना अटक न करणे, कॉल डिटेल्स व चिठ्ठीची तपासणी करण्यास मोठी दिरंगाई करणे या गोष्टी निश्चितच संशयास्पद व संशयीतांना मदत करणार्‍या वाटतात.

मयत ज्ञानेश्वर बडगुजरने आत्महत्येच्या सात दिवस आधी धुळे येथील महिला तक्रार निवारण कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर जबाब दिला होता.

या जबाबाची प्रत सोनगीर पोलीसांना देण्यात आली आहे. यात अजुन कोणी दोषी व्यक्ती असतील त्यांचा शोध व्हावा व या सर्व बाबींची त्रयस्थ यंत्रणेमार्मत चौकशी व्हावी ही नम्र विनती.

साहेब…तरुण मुलाच्या निधनाच्या दुसर्‍या दिवसापासुन आम्हाला पोलीस ठाण्याच्या खेटा घालाव्या लागत आहेत. आम्ही वेदनेने दिलेली आर्त हाक ऐका व यासंदर्भात येत्या तीन दिवसात कारवाई करण्याचे निर्देश द्या.

अन्यथा दि.13 ऑक्टोंबर पासुन रोज कापडणे व धुळे येथे पोलीस प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढणे- पुतळा दहन करणे, मुक मोर्चा काढणे, लाक्षणिक उपोषण करणे, घंटानाद आंदोलन करणे, आमरण उपोषण करणे आदी स्वरुपातील आंदोलने रोज केली जातील याची दखल घ्यावी असा इशाराही शेवटी देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*