देशाच्या स्वातंत्र्यासाठी शाहिरी परंपरेचे महत्वपूर्ण योगदान

0

धुळे । दि.10 । प्रतिनिधी-शाहिरीचे योगदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. शाहिरांची प्रबोधनाची परंपरा जपल्यामुळेच स्वातंत्र्य चळवळीला मोठे यश आले, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

नेहरु युवा केंद्र धुळे व अखिल भारतीय मराठी शाहिर परिषद व जनसेवा माऊंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाकरीता नेहरु युवा केंद्र संगठन महाराष्ट्र-गोवा राज्याच्या राज्य संचालिका संध्या देवतळे, महापौर कल्पना महाले, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे विभागीय अध्यक्ष विनोद ढगे, कार्याध्यक्ष आप्पा खताळ, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक अतुल निकम, शाहिर गंभीर बोरसे, जनसेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीना भोसले, हिरामण गवळी आदी उपस्थित होते.

छत्रपती शाहू नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र संगठन यांच्यावतीने राज्यस्तरीय युवामंडळ पुरस्कार आणि जिल्हास्तरीय युवामंडळ पुरस्कार विजेते यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

राज्यस्तरीय पुरस्कार नंदुरबार येथील युवारंग फाउंडेशन यांना रु.1 लाख रोख व प्रमाणपत्रासह स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले तर जिल्हास्तरीय पुरस्कार धुळे जिल्ह्यातून साक्री तालुक्यातील दहिवेल येथील खानदेश युवा फाऊंडेशन यांना रु. 25 हजार रोख व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमरशेख यांचे योगदान महाराष्ट्रासह देशातील कोणताही शाहीर किंवा कलावंत विसरू शकत नाही, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी स्वच्छता अभियानातंर्गत नेहरु युवा केंद्राच्या वतीने धुळे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धा आणि लघुपट स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

श्रीमती देवतळे यांनी जिल्ह्यातील युवा मंडळांनी ग्रामविकास आणि स्वच्छता अभियान यामध्ये आपले योगदान देवून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलविण्यात महत्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन केले.

अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद जिल्हा धुळे व हमाल मापाडी कामगार संघटनेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अविरत लढा देवून त्यांच्या कल्याणासाठी सतत परिश्रम घेवून यावेळी चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला

महापौर कल्पना महाले यांनी मार्गदर्शन करतांना युवा पिढीला शासनाच्या कल्याणकारी योजना गरजू नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.

धुळे, नंदुरबार व जळगांव या तिनही जिल्ह्यातून 22 कला पथकांनी आपली कला सादर केली. यामध्ये प्रामुख्याने सुनंदा कोचुरे यांनी लावणी, विनोद ढगे यांनी शाहिरी मटका, गंभीर बोरसे आणि अप्पा खताळ यांनी सवाल-जवाब, शेषराव गोपाळ यांनी शाहिरी गण, संजय शिंदे यांनी टिंगरी पथक, दर्पेश कोळपे यांनी देवा तुझ्या दारी, गजानन माळी यांनी युध्दाची गाणी व कापडणे येथील वारकरी यांनी शाहिरी दिंडी सादर केली.

 

LEAVE A REPLY

*