ग्रा.पं.निवडणुकीत राजकीय पक्षांना संमिश्र यश

0

धुळे । दि.9 । प्रतिनिधी-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल संमिश्र लागला असून प्रत्येक नेत्यांनी विजयाचे दावे करीत आपल्याच पक्षांचे वर्चस्व असल्याचे दावे केले आहेत. विजयानंतर उमेदवारांनी जल्लोष केला तर पराभूत उमेदवारांनी कारणमिमांसा शोधण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात 108 ग्रा.पं.ची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर शंभर ग्रामपंचायतींसाठी 7 ऑक्टोंबरला निवडणूक घेण्यात आली. त्यात धुळे तालुक्यात 33, शिरपूर तालुक्यात 17, शिंदखेडा तालुक्यात 19 आणि साक्री तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींचा समावेश होता. झालेल्या एकुण मतदानाची टक्केवारी 78 टक्के एवढी होती. आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले.

धुळे तालुका-

धुळे तालुक्यातील मतमोजणी शासकीय तांत्रिक विद्यालयात झाली. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होऊन दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर करण्यात आले. यावेळी उमेदवारांसह समर्थकांनी कारागृहाजवळ, घोगरे शैक्षणिक चौक तसेच सरदार पटेल उद्यान आणि जिजामाता हायस्कुलसमोर मोठ्या संख्येने गर्दी केली होती.निकालनंतर विजयी उमेदवारांचे समर्थक जल्लोष करीत होते. त्याचप्रमाणे गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला जात होता.याठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. धुळे तालुक्यात काँग्रेसने काही ग्रामपंचायती कायम राखल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतींमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही झेंडा फडकला आहे. 33 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतींवर जवाहर गटाची सत्ता आल्याचा दावा आ. कुणाल पाटील यांनी केला आहे. तालुक्यातील नगाव येथील अत्यंत चुरशीची ठरलेल्या निवडणूकीत भाजपाच्या सौ. ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांनी बाजी मारली आहे. सरपंचपदासाठी ज्ञानज्योती भदाणे विजयी झाल्या असून त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार व सासू सुशिलाबाई दत्तात्रय भदाणे यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचप्रमाणे तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या फागणे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून सरपंचपदाचे विजयी उमेदवार विलास चौधरी यांनी एकहाती सत्ता राखली आहे.

शिंदखेडा तालुका
शिंदखेडा तालुक्यात 19 पैकी 13 ग्रामपंचायतींवर भाजपाचे कमळ उमलले आहे. राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्यात भाजपाचा किल्ला अभेद्य ठेवला आहे. कुरुकवाडे येथील ग्रामपंचायत गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसच्या हाती होती. परंतू आता तेथे भाजपाने झेंडा रोवला आहे. याशिवाय अनेक ग्रामपंचायतींवर भाजपाचे सरपंच निवडून आले आहे. तर काँग्रेसने तालुक्यात आपल्या पक्षाने वर्चस्व मिळविल्याचा दावा केला आहे.

शिरपूर तालुका
शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर आ. अमरिशभाई पटेल यांचा करिष्मा मात्र कायम आहे. 17 पैकी 13 ग्रामपंचायतींवर काँग्रेसने झेंडा फडकला आहे. तर भाजपा – शिवसेनेही या तालूक्यातील अनेक ग्रा.पं. वर खाते उघडले आहे. या निवडणुकीसाठी काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनीही कंबर कसली होते. तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या बोराडी ग्रा.ंप.वर रंधे परिवाराने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

साक्री तालुका
साक्री तालुक्यात काँग्रेसने वर्चस्व सिध्द केले आहे. 33 ग्रा.पं.पैकी 25 ग्रा.पं.वर काँग्रेसचे सरपंच निवडून आले आहे. तर उर्वरीत जागांवर भाजपा शिवसेनेचे सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. या तालुक्यातील कुडाशी ग्रा.पं. निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागलेले होते. याठिकाणी आ.डी.एस.अहिरे यांच्या पत्नी कुसुम अहिरे व जि.प.चे माजी कृषी सभापती शिवाजी भोये यांच्या पत्नी रिना भोये यांच्यात सरपंच पदासाठी लढत होती. त्यात कुसुम अहिरे यांनी माजी मारली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी रिना भोये यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

निवडणूक प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. या निवडणुकीत जिल्ह्यात राजकीय पक्षाच्या एकाही बढ्या नेत्याची सभा झाली नव्हती. सामान्य कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. या कार्यकर्त्यांनीच विजयश्री खेचून आणल्याचे राजकीय नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
विजयानंतर उमेदवारांनी जल्लोष केला. तर पराभूत झालेल्या उमेदवारांनी कारणमिमांसा शोधण्यास सुरुवात केली आहे.

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात 73 ग्रा.पं.वर काँग्रेसचा झेंडा-सनेर

शिंदखेडा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होवू घातल्या होत्या. पैकी काँग्रेस पक्षाची कळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. 19 ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या. त्यात काँग्रेस पक्षाने निमगुळ, माळीच, वरसुच, ग्रामपंचायती भाजपाकडून खेचून आणल्या आहेत. तर गोराणे, नरडाणा, चिमठाणे, दराणे, रोहाणे, जोगशेलू, रामी, अमळथे या ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाकडे बहुमताने निवडूण आलेल्या आहेत. एकूण 12 ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. राज्याचे रोहयो मंत्री ना.जयकुमार रावल यांनी मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर करुनही जनतेने त्यांना नाकारले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी दिली आहे.
73 ग्रामपंचायतींवर वर्चस्व- धुळे जिल्ह्यातील 103 ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस पक्षाने 73 ग्रामपंचायती जिंकलेल्या आहेत. शिरपूर तालुक्यात 17 पैकी 13, साक्री तालुक्यात 33 पैकी 28, शिंदखेडा तालुक्यात 19 पैकी 12 व धुळे ग्रामीणमध्ये 33 पैकी 20 ग्रामपंचायतींवर काँग्रेस पक्षाने वर्चस्व सिध्द केले आहे. असेही सनेर म्हणाले.

 

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात भाजपाची आगेकूच – ना. रावल

राज्यासह धुळे आणि नंदूरबार जिल्हयातील ग्रामीण भागातील जनतेने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश दिले असून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेवून संसद ते ग्रामपंचायत अशा सर्वच ठिकाणी भाजपाचा झेंडा रोवला आहे, त्यामुळे धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री तथा नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी केले आहे.
आज धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले त्यात नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच भाजपाने जबरदस्त मुंसडी मारली असून धुळे जिल्ह्यात देखील भाजपाने सर्वाधिक सरपंच भाजपाचे निवडून आले आहेत.
ग्रामपंचायतीच्या निकालानंतर ना.रावल म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ आणि पारदर्शक आणि जनतेच्या हिताच्या निर्णयामुळेच राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परीषदा आणि आता थेट ग्रामपंचायतीत देखील जनतेने भाजपालाच प्रथम पसंती देत सर्वाधिक सरपंच विराजमान केले आहेत, त्यामुळे देशाच्या संसदेपासून तर ग्रामपंचायतीपर्यंत एकाच विचासरणीचे कार्यकर्ते काम करतील म्हणून ग्रामीण भागाच्या विकासाला निश्तिच चालना मिळणार असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे, त्यामुळे भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे, दोन्ही जिल्हे हे काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जात होते, पंरतू ज्या पध्दतीने भाजपाने मुसंडी मारली आहे ती निश्चितच वाखाणण्याजोगी असल्याचे देखील ना.जयकुमार रावल यांनी म्हटले आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*