गांधीवादी साहित्यिक डॉ.मु.ब.शहा अनंतात विलीन

0
धुळे|  प्रतिनिधी  :  येथील सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्रा.डॉ.मु.ब.शहा यांचे आज दि.८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.२५ वाजता धुळ्यातील राहत्या घरी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.

सकाळी ११ वाजता येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवादल, छात्रभारती, स्काऊट गाईड, राष्ट्रभाषा प्रचारसभा आदी संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.डॉ.शहा यांच्या पश्‍चात पत्नी ज्येष्ठ संगीततज्ज्ञ राजश्री शहा, मुली ऋचा, प्रज्ञा आणि मुलगा सौमित्र असा परिवार आहे.

डॉ.शहा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. काल त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी पहाटे त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्‍वास घेतला. शासकीय कर्मचारी वसाहतीतील राहत्या घरापासून प्रा.डॉ.शहा यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

देवपूरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी राष्ट्रसेवा दलातर्फे राष्ट्रीय गीतगान म्हणून डॉ. शहा यांना सलामी देण्यात आली.

यावेळी माजी आ. जे.यू.ठाकरे, लखन भतवाल, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.अनिल सोनार, प्रा.डॉ.पितांबर सरोदे, राष्ट्रसेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद कपोले, वृक्षमित्र वसंतराव ठाकरे, राजेंद्र बहाळकर, डॉ. सलिम अन्सारी, शांताराम शेंडेे, छात्रभारतीचे राज्याध्यक्ष दत्ता ढगे, राष्ट्रसेवा दलाचे सहमंत्री विलास किरोटे, आशाताई रंधे, मिलिंद बोरसे, प्राचार्य डॉ.विश्वास पाटील, ऍड.जी.व्ही.गुजराथी, ऍड.यतीष गुजराथी, गो.पी.लांडगे, कवी जगदीश देवपूरकर, सुलभा भानगावकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे, प्राचार्य कृष्णा पोतदार, प्रा.चेतन सोनार हेंमत मदाने, माजी आ. प्रा,शरद पाटील, भुपेंद्र लहामगे, निरंजन भतवाल यांच्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्हयातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

साहित्य क्षेत्रात मोठे योगदान

प्रा.डॉ.शहा यांचे साहित्य क्षेत्रात योगदान राहीले असून विपूल ग्रथंसंपदा त्यांनी निर्माण केली. हिंदी भाषेवर त्यांचे मोठे प्रभुत्व होते. हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी सतत कार्य केले. मराठी साहित्य हिंदीत अनुवादीत करण्यासाठी ते परिचीत होते.

त्यांनी सुमारे ५० पुस्तकांचे लिखाण केले. त्यात राजवाडे संशोधन मंडळाच्या तेरा खंडांचे संपादनही केले. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. साने गुरूजींच्या कथांचा हिंदीत अनुवाद करून त्यांनी मराठी साहित्यातही कक्षा रूंदावल्या होत्या.

गांधी विचारांचा प्रचार-प्रसार, इतिहास संशोधन, अनुवाद करून हिंदी साहित्य निर्मितीत प्रा.डॉ.शहा यांचे मोठे योगदान राहीले आहे. राष्ट्रभाषा सभा, राष्ट्र सेवा दल, आंतरभारती या संस्थामध्ये मोठी पदे भुषवितांना त्यांनी या संस्थाच्या विस्तारासाठी प्रयत्न केले. छात्रभारती या संघटनेचे डॉ.शहा संस्थापक होते. मनमिळावू स्वभावाचे डॉ.शहा हे गांधी विचाराने जीवन जगणारे व्रतस्थ साहित्यीक होते.

प्रा.शहा यांनी विविध सामाजिक संघटनांना बळ देऊन त्या संस्थाचा आधारवड बनले. त्यांची विचार मांडण्याची भाषाशौली सर्वांना भावणारी होती. त्यांना हिंदी साहित्यातील मानाच्या गंगाशरण पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय इतर अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला होता.

भाईंनी आंदोलनकर्त्यांना पोरके केले

डॉ.मु.ब. शहा उर्फ भाईंचे निधन म्हणजे नर्मदा आंदोलनासह अनेक जनआंदोलनाच्या साथीचे निर्वाण. साहित्य विशारद व भाषाप्रभू असलेले भाई हे समाजवादी विचारवंत तसेच युवा व बुजुर्ग आंदोलनकर्त्यांचे परममित्र होते. त्यांची भाषाच नव्हे तर भावना ही अत्यंत दुर्मिळ व प्रेमळ होती म्हणूनच ते भाई होते.

त्यांचा शोध व ग्रंथसंपदा जितकी मोठी तितकीच त्यांची परिवर्तनवादी जनसंपदाही व्यापक होती. नर्मदा आंदोलनाच्या सर्व प्रथम समर्थकांपैकी एक असे भाई आज आव्हानात्मक टप्प्यावर आम्हाला सोडून गेले आहेत. छात्रभारती, राष्ट्रसेवा दल व नर्मदा बचाओ आंदोलनही पोरके झाले आहे. मात्र भाईंची प्रेरणा आमच्या सोबत होत्या, संघर्ष काळातही राहील, हाच विश्‍वास आहे.
– मेधा पाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

LEAVE A REPLY

*