शंभर ग्रा.पं.साठी 78 टक्के मतदान : उद्या निकाल

0

धुळे । दि.7 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील चार तालुक्यातील शंभर ग्रामपंचायतींची निवडणूक किरकोळ वाद वगळता आज शांततेत पार पडली. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.

जिल्ह्यात सरासरी 78 टक्के मतदान झाले आहे. तर 2219 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात आज बंद झाले आहे. धुळे तालुक्यात 78.20, साक्री तालुक्यात 78.14, शिंदखेडा तालुक्यात 7732 आणि शिरपूर तालुक्यात 75.14 मतदान झाले.

जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील 108 ग्रामपंचायतींसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

त्यापैकी आठ ग्रामपंचयाती बिनविरोध झाल्या. त्यामुळे शंभर ग्रामपंचायतींसाठी निवडणुक आज दि. 7 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली.

त्यात धुळे तालुक्यात 33, शिरपूर तालुक्यात 17, शिंदखेडा तालुक्यात 19 आणि साक्री तालुक्यात 31 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

धुळे तालुक्यातील शिरुड, फागणे, मुकटी, नगाव, न्याहळोद, शिरपूर तालुक्यातील थाळनेर, मांजरोद, हिसाळे, करवंद, बोराडी, वाघाडी, अर्थे बुद्रूक, अर्थे खुर्दे, शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा, चिमठाणे, निमगुळ, कुरुकवाडे तर साक्री तालुक्यातील कुडाशी या ग्रामपंचायतींमध्ये प्रतिष्ठेचे लढती रंगल्या होत्या. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप करण्यात आला.

सरपंच पदासाठी 320 तर सदस्य पदासाठी 1899 असे एकूण 2219 उमेदवारांनी भवितव्य अजमावले. त्यात जिल्ह्यात सरपंचपदासाठी धुळे तालुक्यात 102, शिरपूर तालुक्यात 52, शिंदखेडा तालुक्यात 46, साक्री तालुक्यात 120 उमेदवारांचा समावेश होता.

तर सदस्य पदासाठी धुळे तालुक्यात 704, शिरपूर तालुक्यात 347, शिंदखेडा तालुक्यात 236, साक्री तालुक्यात 512 उमेदवारांनी भविष्य अजमाविले आहे.

आज दि. 7 ऑक्टोबर रोजी सदस्य व सरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले. सर्व केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली.

सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात मतदारांचा उत्साह दिसून आला. परंतू त्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत काही केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. दुपारी 3 वाजेनंतर मतदानाचा टक्का वाढण्यास सुरुवात झाली.

कार्यकर्ते देखील मतदारांना बाहेर काढण्यासाठी सूचना करीत होते. अपंग, वृध्द यांना मतदान केंद्रांवर पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांसह त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होतांना काही केंद्रांवर दिसून आली.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिस अधिक्षक एम. रामकुमार यांनी देखील धुळे तालुक्यातील काही केंद्रांना भेटी देवून आढावा घेतला.

 

LEAVE A REPLY

*