जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

0

धुळे । दि.6 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील 100 ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या दि. 7 ऑक्टोंबर रोजी मतदान होत आहे. सरपंच पदासाठी एकूुण 320 तर सदस्य पदासाठी 1899 असे एकूण 2219 उमेदवार रिंगणात आहेत.

आज सायंकाळी प्रचार थंडावला. दरम्यान, मतदान अधिकारी व मतदान यंत्रे आज मतदान केंद्रांवर रवाना झाले. मतदान प्रकीया शांततेत पार पडावी म्हणून जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कुठेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी निवडणूक विभाग प्रक्रीयेवर लक्ष ठेवणार आहे. मतमोजणी 9 ऑक्टोबरला होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे.

जिल्ह्यातील 108 ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रक्रीया सुरु आहे. माघारीच्या वेळेस आठ ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या तर उर्वरीत 100 ग्रा.पं.साठी निवडणूक होत आहे.

जिल्ह्यात सरपंच पदासाठी 320 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात धुळे तालुक्यात 102, शिरपूर तालुक्यात 52, शिंदखेडा तालुक्यात 46, साक्री तालुक्यात 120 उमेदवारांचा समावेश आहे.

तर सदस्य पदासाठी जिल्ह्यात 1899 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात धुळे तालुक्यात 704, शिरपूर तालुक्यात 347, शिंदखेडा तालुक्यात 236, साक्री तालुक्यात 512 उमेदवारांचा समावेश आहे.

धुळे तालुका
धुळे तालुक्यात शिरुड, फागणे, मुकटी, नगाव, न्याहळोद या मोठ्या ग्राम पंचायतींच्या निवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रत्येक ठिकाणी सरपंचपदाची लढत चुरशीची ठरत आहे. प्रथमच जनतेतून सरपंच पदाची निवड होत असल्यामुळे ही निवड प्रतिष्ठेची ठरत आहे. सरपंच पदाच्या निवडणूकीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे सर्व मतदारांना मतदान करण्याचा अधिकार राहणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तालुक्यातील शिरुड, फागणे, मुकटी आणि न्याहळोद येथील सरपंच पदाच्या निवडीत चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान तालुक्यातील मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी आज मतदान यंत्रांसह रवाना झाले. तत्पुर्वी तहसीलदारांनी कर्मचार्‍यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले.

साक्री तालुका
साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक अधिकारी तहसीलदार संदीप भोसले यांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. यानंतर सर्व कर्मचारी इव्हीएम मशीन व इतर साधन सामुग्री घेवून दिलेल्या ग्रामपंचायत मतदान केंद्राकडे रवाना झालेत.
साक्री तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. त्यासाठी आज दि 6 रोजी येथील तहसील कार्यालयातून निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेसाठी इ.व्ही.एम. मशीन व साधनसामुग्री निवडणूक कर्मचार्‍यांना वाटप करण्यात आले.याप्रसंगी निवडणूक अधिकारी तहसीलदार संदीप भोसले यांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार मिलिंद वाघ, विनोद ठाकूर व जयवंत पाटील आदी उपस्थित होते.
एकूण 31 ग्रामपंचायतीसाठी तालुक्यात निवडणूक होत असून यासाठी 121 प्रभाग आहेत. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष 121, मतदान अधिकारी 363, शिपाई 121 असे एकूण 605 कर्मचारी आहेत. तसेच मतदान करण्यासठी 121 इ.व्ही.एम. मशीन देण्यात आले आहेत. तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून त्यात कालदर व आमोडे या दोन ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत 31 ग्रामपंचायतीसाठी 9 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत 325 जागा पैकी 4 सरपंचासह 157 सदस्य उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. तसेच 153 सदस्यपदासाठी 298 उमेदवार तर 29 गावांच्या सरपंच पदासाठी 110 उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी रिंगणात आहेत.

शिंदखेडा तालुका
जिल्ह्यात 108 ग्राम पंचायती पैकी 8 ग्राम पंचायती बिनविरोध झाल्याने आता उर्वरीत 100 ग्राम पंचायतीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. शिंदखेडा तालुक्यात 23 ग्राम पंचायतींपैकी चार ग्राम पंचायती या बिनविरोध झाल्या तर 19 ग्राम पंचायतींची निवडणूक आज होणार आहे. त्यासाठी यात नरडाणा, चिमठाणे, निमगुळ, कुरुकवाडे या ग्राम पंचायतींमध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे. यात नरडाणा व चिमठाण येथे भाजपा विरुध्द भाजपा असे चित्र दिसून येत आहे.

शिरपूर तालुका
शिरपूर तालुक्यात 17 ग्राम पंचायतींसाठी निवडणूक होत असून दि. 7 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचा प्रभाव कायम असून काही ग्रामपंचायतींमध्ये चुरस असल्याचे चित्र आहे.
थाळनेर ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत सर्वसाधारण जागेसाठी गणेश आधार चौधरी, ज्ञानेश्वर पितांबर पाटील, प्रशांत अशोक निकम, दिपक शामसिंग जाधव यांच्यात चौरंगी लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून एम.ए.वाडीले काम पाहत आहेत. हिसाळे ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी वर्षा रामेश्वर पाटील, कावेरी प्रमोद पाटील, स्वाती विकास पाटील, नरुबाई बुधा पावरा यांच्यात लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून एन.आर.पाटील काम पाहत आहेत.

अर्थे बु. ग्राम पंचायतीत नागरीकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी चेतन भिमराव पाटील व साहेबराव दगा पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून बी.पी.काळेकर काम पाहत आहेत. अर्थे खु. ग्राम पंचायतीत ना.मा.प्र. स्त्री जागेसाठी वैशाली प्रदिप गुजर व दिपाली अनिल पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून एस.बी.जगताप काम पाहत आहेत. वरझडी ग्राम पंचायतीत एस.टी. जागेसाठी नयना गोविंदा पावरा, निरमा रामदास पावरा, वंदना दिलीप पावरा, अनिता सुनिल भिल यांच्यात चौरंगी लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून कुलकर्णी काम पाहत आहेत.

महादेव दोंदवाडे ग्राम पंचायतीत एस.टी. स्त्री जागेसाठी विसलाबाई मोवाशा पावरा, सायबीबाई रहेमान वळवी यांच्यात सरळ लढाई होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून बी.एस.कोळी काम पाहत आहेत.

खर्दे पाथर्डे ग्राम पंचायतीसाठी ना.मा.प्र.जागेसाठी प्रकाश चिंतामण पाटील व सुनिल भास्कर पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून पी.एस.गवळी काम पाहत आहेत.

अजनाड ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सर्वसाधारण स्त्री जागेसाठी योगिता जयसिंग पवार, सोदराबाई गंगाराम बंजारा, रमिला दिलीप पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून व्ही.पी.राठोड काम पाहत आहेत. करवंद ग्रामपंचायतीत सर्वसाधारण स्त्री जागेसाठी बेबीबाई देविदास पाटील व मनिषा देवेंद्र पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून पी.पी.ढोले काम पाहत आहेत. तर्‍हाड कसबे ग्राम पंचायतीसाठी एस.टी. स्त्री जागेसाठी ताईबाई धनसिंग भिल, चित्राबाई नानाभाऊ भिल, धुमाबाई वसंत भिल, ललिता पिंटू भिल यांच्यात चौरंगी लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून आर.डी.बागुल काम पाहत आहेत.

अजंदे बु. ग्राम पंचायतीत ना.मा.प्र. स्त्री जागेसाठी वैशाली लिलाचंद पाटील व सुंदरबाई सदाशिव पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे.निर्वाचन अधिकारी म्हणून पी.एन.गावित काम पाहत आहेत.
मांजरोद ग्राम पंचायतीत सर्वसाधारण जागेसाठी भुलेश्वर युवराज पाटील, सुरेश दादूसिंग राजपूत, सुभाष लक्ष्मण पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून पी.के.मराठे काम पाहत आहेत. वाघाडी ग्रामपंचायतीत ना.मा.प्र.स्त्री जागेसाठी कल्पना नाना कोळी, उज्ज्वला प्रतापराव पाटील व सुनंदा किशोर माळी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून के.पी.खैरनार काम पाहत आहेत. हाडाखेड ग्राम पंचायतीत एस.टी. स्त्री जागेसाठी निशा सुरेश पावरा, महुबाई चत्तरसिंग पावरा, शेवंताबाई दात्या भिल, ललिता बिहारीलाल पावरा यांच्यात सरळ लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून श्रीमती एस.एस.निळे काम पाहत आहेत. तोंदे ग्रामपंचायतीत एस.टी.जागेसाठी अरुणाबाई महारु ठाकरे व मंगलाबाई संतोष अहिरेयांच्यात सरळ लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून श्रीमती व्ही.एस.सावळे काम पाहत आहेत.

बोराडी ग्राम पंचायतीत एस.टी. स्त्री जागेसाठी मयुरी सुरेंद्रसिंग पवार व सुरेखा सिताराम पावरा यांच्यात सरळ लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. खंबाळे ग्राम पंचायतीत एस.टी. जागेसाठी बहुरंगी लढत होत असून सात उमेदवार नशीब आजमावत आहेत. मंगा शिवल्या भिल, हसरत पंढरीनाथ भिल, आसाराम चतरसिंग पावरा, कृष्णा रोहिदास पावरा, रामचंद्र थोटू पावरा, सुभाष गुरज्या पावरा, सुनिल शिलदार पावरा यांच्यात बहुरंगी लढत होत आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून ए.सी.गुजर काम पाहत आहेत. शिरपूर तालुक्यातील करवंद, थाळनेर, बोराडी, अर्थे व हिसाळे येथील प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. तालुक्यातील 17 ग्राम पंचायतींची निवडणूक दि. 7 ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यामुळे प्रचाराला वेग दिला आहे. प्रचाराला केवळ दोन दिवस शिल्लक असल्यामुळे रिंगणातील उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी रॅली काढण्यावर भर देत आहे. शिरपूर तालुक्यात 347 उमेदवार सदस्य पदासाठी तर 52 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. 201 जागांमधून 52 जागा यापुर्वी बिनविरोध झाल्या आहेत. हाडाखेड येथे सर्वच जागा बिनविरोध झाल्या आहेत. परंतु सरपंच पदासाठी चौरंगी लढत होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*