धुळे जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान : ९ रोजी मतमोजणी

0
धुळे |  प्रतिनिधी :  जिल्ह्यात शंभर ग्रामपंचायतींची निवडणुक ७ ऑक्टोबर रोजी होत असून मतमोजणी दि. ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.  मतदान यंत्रावर प्रत्येक बटनापुढे उमेदवारांची नावे, त्यापुढे चिन्ह अशा पध्दतीने फिडींग करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी सर्व मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचारी हे नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर पोहचतील. शनिवारी ७ ऑक्टोबरला सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल.

सायंकाळी मतदान संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत यंत्र दाखल होतील. धुळे येथे शासकीय तांत्रिक विद्यालय शिंदखेडा आणि साक्री येथे तहसील कार्यालयात आणि शिरपूर येथे तहसील कार्यालयात यंत्र जमा केले जातील.

धुळे तालुक्यात शिरुड, फागणे, मुकटी, नगाव, न्याहळोद या मोठ्या ग्राम पंचायतींच्या निवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रत्येक ठिकाणी सरपंच पदाची लढत चुरशीची ठरत आहे. प्रथमच जनतेतून सरपंच पदाची निवड होत असल्यामुळे ही निवड प्रतिष्ठेची ठरत आहे.

सरपंच पदाच्या निवडणूकीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे सर्व मतदारांना मतदान करण्याचा अधिकार राहणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तालुक्यातील शिरुड, फागणे, मुकटी आणि न्याहळोद येथील सरपंच पदाच्या निवडीत चुरस निर्माण झाली आहे.

शिरपूर तालुक्यातील करवंद, थाळनेर, बोराडी, अर्थे व हिसाळे येथील प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. तालुक्यातील १७ ग्राम पंचायतींची निवडणूक दि. ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यामुळे प्रचाराला वेग दिला आहे.

प्रचाराला केवळ दोन दिवस शिल्लक असल्यामुळे रिंगणातील उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी रॅली काढण्यावर भर देत आहे. शिरपूर तालुक्यात ३४७ उमेदवार सदस्य पदासाठी तर ५२ उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. २०१ जागांमधून ५२ जागा यापुर्वी बिनविरोध झाल्या आहेत. हाडाखेड येथे सर्वच जागा बिनविरोध झाल्या आहेत. परंतु सरपंच पदासाठी चौरंगी लढत होत आहे.

LEAVE A REPLY

*