शिक्षणाधिकारी मोहन देसले यांची ‘एसीबी’कडून चौकशी

0
धुळे |  प्रतिनिधी  :  येथील जि.प.शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना आज सायंकाळी एसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. गट शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे लाचप्रकरणात काल अटक करण्यात आली आहे. त्या घटनेच्या संदर्भात देसले यांची ही चौकशी केली जात आहे. उद्या पुन्हा काही अधिकारी व कर्मचार्‍यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.

गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरेला काल मंगळवारी एसीबीने नऊ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. २७ शिक्षकांकडून प्रत्येकी तीन हजार या प्रमाणे ८१ हजार रुपये देवरेने सदरच्या शिक्षकांकडे मागितले होते. त्यापैकी तक्रारदाराकडून ९ हजार रूपये घेताना देवरे जाळ्यात अडकल्या.

त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आज सायंकाळी शिक्षणाधिकारी मोहन देसलेला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. संतोषी माता चौकातील एसीबी कार्यालयात त्यांची रात्री तीन तासापर्यंत चौकशी झाली. यानंतर देसले यांना रात्री आठ वाजता सोडून देण्यात आले.

देवरे लाच प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहीती सुत्रांनी दिली. याबाबत शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना विचारणा केली असता, त्यानी सेवापुस्तीकेवर सह्या करण्यासंदर्भात काय नियम आहेत आणि त्या नियमांचे सौ. देवरे यांनी पालन केले होते का? याबाबत एसीबीने विचारणा केल्याचे सांगीतले.

लाचखोर देवरेंची कारागृहात रवानगी

नऊ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी सुरेखा नारायण देवरे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. दरम्यान देवरे यांनी जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असून त्यावर दि.६ ऑक्टोबर रोजी कामकाज होण्याची शक्यता आहे.

शिक्षकांच्या हजेरी पुस्तकात नोंद करुन घेण्यासाठी नऊ हजाराची लाच घेतांना धुळे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा नारायण देवरे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहात पकडले. त्यांना अटक करण्यात आली असून आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने देवरे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार देवरे यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान देवरे यांनी ऍड. एस.आर.पाटील यांच्या वतीने जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात आज दाखल केला. या अर्जावर दि. ६ ऑक्टोबर रोजी कामकाज होण्याची शक्यता आहे.

सुरेखा या महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते कमलेश देवरे यांच्या भगिनी आहेत.

LEAVE A REPLY

*