वाळूची तस्करी; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

धुळे । दि.23 । प्रतिनिधी-मुंबई-आग्रा महामार्गावरुन वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर वरखेडी गावानजीक पकडण्यात आले. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावरुन एमएच18 झेड 2004 मधून एक ब्रास वाळू विनापरवाना वाहतूक करतांना विलास सुुदाम ठाकरे हा वरखेडी गावाजवळ आढळून आला.

त्याच्याकडून ट्रॅक्टर व एक ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात यशवंत रामभाऊ पाटील यांनी फिर्याद दिली. भादंवि 379, महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48/7, 48/8 प्रमाणे विलास सुदाम ठाकरे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

बालकाचे अपहरण- साक्री रोडवरील मुलांच्या निरीक्षण गृहातील अनाथ बालकाला निरीक्षण गृहातून अज्ञात व्यक्तीने दि. 20 सप्टेबर रोजी रात्री आठ ते 21 सप्टेबरच्या सकाळी आठ वाजेदरम्यान पळवून नेले. याबाबत गौरव कुंदन वानखेडकर, रा.प्लॉट नं.38, सत्यसाई बाबा कॉलनी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुध्द भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेचा मृत्यू – धुळे-चाळीसगाव रोडदरम्यान तरवाडे गावाजवळून पायी जात असताना अनोळखी महिलेस ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर महिला गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. याबाबत सिकंदर सुलेमान खाटीक, रा.तरवाडे यांनी तालूका पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यावरून अज्ञात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलाचे अपहरण – धनूर, ता.धुळे शिवारातील एका शेतकर्‍याच्या शेतात काम करणार्‍या सालदाराच्या 14 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजुराचा मृत्यू – वरझडी, ता.शिरपूर येथे झोपडी अंगावर पडून 32 वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काल्या उभल्या पावरा, रा.वरझडी असे या मृत मजुराचे नाव आहे. वरझडी येथील शेतातील झोपडी अंगावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला शिरपूर कुटीर रुग्णालयात दाखल केले असता काल्या पावरा याचा काल सकाळी दहा वाजता मृत्यू झाला.

दारुचा अड्डा उद्ध्वस्त – पिंपळनेर पोलिसांनी टेंभेपैकी मोखडपाडा येथे धाड टाकली असता निंबा झिपरु वळवी, रा.मोखडपाडा हा गावठी दारु तयार करतांना पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडून गावठी दारुसाठी लागणारा गुळ आणि महूचे रसायन, 50 लिटर गावठी दारु, दहा प्लास्टीकचे डम, रांजण, नळी असा 14 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन नष्ट केला. पोकाँ विशाल मोहने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निंबा वळवी याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

व्यापार्‍याला मारहाण-कारण नसतांना एका व्यापार्‍याला मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत शहर पोलिसांत एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. महावीर ड्रेसेसचे मालक शैलेश बाबुलाल जैन (वय 42) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सतीष पारसमलजी आचलिया, रा.धुळे याने शैलेज जैन यांच्यासह इतरांना मारहाण केली.

दानपेटीतून 50 हजाराचा ऐवज लंपास – शहरातील चाळीसगाव रोडवरील पैदल हाजी बाबा दर्ग्याची दानपेटी फोडून चोरट्यांनी 50 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चाळीसगाव-मालेगाव रोडदरम्यान मरहूम अलहाज मियाँ सुलेमान मियाँ (पैदल हाजी बाबा) यांचा दर्गा आहे. या दर्ग्याचा 24 सप्टेबरला उरुस असतो. त्यासाठी गेल्या वर्षभरात या दर्ग्याच्या दानपेटीत दानशूर दान टाकतात, परंतु रात्री चोरट्यांनी ही दोनपेटी फोडून पेटीतील अंदाजे 50 हजाराची रक्कम लंपास केली आहे.

मोटार सायकल चोरी – शिरपूर येथील पित्रेश्वर कॉलनीत राहणारे योगेश अशोक श्रीराम यांनी त्यांच्या मालकीची एमएच18 एएस 3354 क्रमांकाची 20 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल निमझरी नाका येथे लावलेली होती. सदर मोटार सायकल दि. 20 सप्टेंबरच्या सकाळी 7.30 ते 8 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात योगेश अशोक श्रीराम यांनी फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपूर शहरातील आदर्श नगरात राहणारे पवन लक्ष्मीदास अग्रवाल यांनी त्यांच्या मालकीची 15 हजार रुपये किंमतीची एमएच 18 वाय 2354 क्रमांकाची मोटार सायकल घरासमोर लावलेली होती. अज्ञात चोरट्याने सदर मोटार सायकल चोरुन नेली. अशी फिर्याद शिरपूर शहर पोलिस ठाण्यात पवन लक्ष्मीनारायण अग्रवाल यांनी दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

काळगाव येथे दुकान फोडले
काळगाव, ता. साक्री येथील माऊली व साई समर्थ मेडीकल दुकान अज्ञात चोरट्यांनी दि. 21 सप्टेंबरच्या सकाळी 8 ते दि.22 सप्टेंबर पहाटे 6 वाजेदरम्यान फोडून दुकानातून 79 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला त्यात रोकड व लॅपटॉप, मोबाईलचा समावेश आहे. याबाबत राजधर उत्तम देसले यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक बडगुजर हे करीत आहेत.

धुळ्यात दुकान फोडले
धुळे शहरातील देवपूर परिसरात सावरकर पुतळा चौकातील संभाजी गार्डन समोरील टपरी अज्ञात चोरट्याने फोडून टपरीतून 18 हजार 175 रुपये किंमतीचे लॅमिनेशन मशिन व सीपीयू आणि 6175 रुपये रोख असा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत वशीम याकूब अत्तार यांनी देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वाघाडी येथे तरुणावर हल्ला
वाघाडी, ता. शिरपूर येथे राहणारे विनोद गुलाब माळी यांच्याशी उसनवारी पैशावरुन भरत मंगाराम कोळीसह चार जणांनी वाद घातला. या वादातून दि. 21 सप्टेेंबर रोजी रात्री 8.30 वाजता चौघांनी विनोदला शिवीगाळ केली व भरत मंगाराम कोळी याने धारदार शस्त्राने भोसकून विनोदला जखमी केले. तसेच काठीने व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत विनोद गुलाब माळी यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 323, 324, 504, 506, 34 प्रमाणे भरत मंगाराम कोळी, आत्माराम कोळी, शरद मंगाराम कोळी, समाधान शरद कोळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मजूराचा मृत्यू
वारुळ, ता. शिंदखेडा येथे राहणारा प्रकाश मुकुंदा माळी (वय21) हा शेतात मजूर म्हणून फवारणी करीत असतांना त्याच्या नाकातोंडात विषारी औषध केले. त्याला उपचारासाठी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार घेतांना डॉ. नितीन देवरे यांनी तपासून प्रकाशला मृत घोषित केले. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात मुकुंदा परशुराम माळी यांनी माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

*