पत्नीला जीवंत जाळले; पतीसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

0
धुळे / पती-पत्नीच्या किरकोळ भांडणावरुन पतीने त्याच्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जळत्या गॅसवर ढकलून दिल्यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सहा जणांविरुध्द मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मोहाडी येथील आंबेडकर वसाहतीत दंडेवालेबाबा नगर येथे राहणारी सौ.अनिता ईश्वर सूर्यवंशी (वय 25) ही दि.21 मे रोजी सायंकाळी सात वाजता तिचे सासरे शंकर दगा सूर्यवंशी यांच्या घरी चितोड रोडवरील शर्मा नगरात गेली असता तेथे विवाहितेच्या सासर्‍यासह पाच जणांनी घरगुती किरकोळ कारणावरुन अनिताला मारहाण केली.
त्यानंतर अनिता व तिचा पती ईश्वर शंकर सूर्यवंशी हे दोघे जण त्यांच्या घरी दंडेवालेबाबा नगरात आले. तेथे दि.23 मे रोजी रात्री नऊ वाजता अनिता व ईश्वर यांच्यात वाद झाला.
या वादात ईश्वरने अनिताच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जळत्या गॅसवर ढकलून दिले व ठार मारण्याचा प्रयत्न केला. अनिताला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अनिताच्या जबाबावरुन मोहाडी पोलिस ठाण्यात भादंवि 307, 323, 504, 506, 34 प्रमाणे विवाहितेचा पती ईश्वर शंकर सूर्यवंशी, सासरा शंकर दगा सूर्यवंशी, सासू सुशिला शंकर सूर्यवंशी, नणंद योगिता, ज्योती, दीर सागर सूर्यवंशी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या वादात ईश्वर शंकर सूर्यवंशी हा देखील जळाल्याने त्याला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर अन्य संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.

तीन जण जखमी – धुळे-सोलापूर रस्त्यावरुन आरजे 14 यु 9191 क्रमांकाच्या कारने धुळ्याकडून औरंगाबादकडे जात असताना शिरुड चौफुलीजवळ एमएच एफक्यु 6687 क्रमांकाच्या टँकरने कारला समोरुन धडक दिली. या अपघातात शाईन खान, सना खान, रुकसाना बानो हे जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात खान यांनी फिर्याद दिली. भादंवि 279, 337, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 प्रमाणे टँकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

आत्महत्या – कुंडाणे, ता.धुळे येथे राहणारा अंबादास देवराज सोनवणे (वय 40) याने दि.22 मे रोजी रात्री आठ वाजता राहत्याघरी काहीतरी विषारी औषध घेतले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ.नितीन देवरे यांनी तपासून अंबादासला मृत घोषित केले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात देवराम शिवाजी सोनवणे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

छेड काढल्याच्या संशयावरुन तरुणाला मारहाण
मोघण, ता.धुळे येथे राहणारा शरद ताराचंद पाटील (वय 24) याने छेड काढल्याच्या संशयावरुन दि.23 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दीपाली भटू पाटीलसह तिघांनी शरदला मारहाण केली. तसेच काठीने डोक्यावर मारल्याने शरद जखमी झाला. याबाबत शरद ताराचंद पाटील यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे दीपाली भटू पाटील, पिंटू पुंडलीक पाटील, भुर्‍या पुंडलीक पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

युवकाची गळफास घेवून आत्महत्या
धुळे शहरातील ऐंशीफूटी रोडवरील तिरंगा चौकात राहणारा बुशरा शेख आरीफ धोबी (वय 17) याने दि.24 मे रोजी सकाळी 11.30 वाजता राहत्याघरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर बुशरा याला खाली उतरवून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.अरुणकुमार नागे यांनी तपासून बुशरा धोबी याला मृत घोषित केले. याबाबत पोना जे.एस.ईशी यांनी चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मुल्लानगरात पोलिसाचे घर फोडले


धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील मुल्ला कॉलनीत नदीम युसूफ शेख या पोलिस कर्मचार्‍याचे घर अज्ञात चोरट्याने फोडले. शेख परिवार सहकुटुंब बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी ही संधी साधली. घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा लाखोंचा मुद्देमाल लांबविला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

पिस्तूल विक्री करणार्‍याला अटक

शहरातील अग्रेसन पुतळ्याजवळ विक्री करण्यासाठी विनापरवाना गावठी बनावटी पिस्तूल तरुणाकडे आढळून आला. त्याला विशेष पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याकडून 50 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव यांना शहरातील अग्रेसन पुतळ्याजवळ गावठी पिस्तूलची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा लावला. त्यावेळी अग्रेसन पुतळ्याजवळ पंकज उर्फ भुर्‍या जीवन बागले (वय 26), रा.उत्कर्ष कॉलनीसमोर, रमाईनगर हा पथकाला संशयास्पदरित्या उभा असलेला आढळून आला. त्याच्याकडे पथक गेले असता तो अग्रवाल नगरकडे पळून जात होता. त्याला पथकाने पकडले व त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 15 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, 400 रुपये किंमतीचे पिस्तूलचे मॅगझिन, तीन हजार रुपये किंमतीची एमएच 18 एएन 9041 क्रमांकाची मोटारसायकल, पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 50 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. सदर मुद्देमाल पथकाने जप्त केला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम चिंतामण मोरे यांनी चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भारताचा हत्यार अधिनियम कलम 3 चे उल्लंघन 25 (1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पंकज उर्फ भुर्‍या किरण बागले याला अटक केली.
सदर कारवाई पोसई रामकृष्ण एस.सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक घनश्याम मोरे, पोना पंकज एन.चव्हाण, सुनील पाथरवट, पोना किसन चौधरी, पोकाँ मोहम्मद मोबीन गालीब, कबीर एस.शेख, दिनेश परदेशी, नीलेश महाजन, किरण साळवे, पंकज खैरमोडे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

*