साक्री । दि.21 । ता.प्र.-मी तुम्हाला बघून घेईन, असा रोष पोलीस यंत्रणेवर व्यक्त करत काळगाव येथील पोलीस पाटील शांताराम देसले यांनी साक्री पोलीस स्टेशन आवारात विष प्राशन केल्याची घटना आज दि 21 रोजी घडली. ही घटना पोलिसांच्या लक्षात येताच देसले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, काळगाव येथील पोलीस पाटील शांताराम सुपडू देसले यांना दि 20 रोजी त्यांच्या पुतण्यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती शांताराम पाटील यांनी पोलीस निरीक्षक आर.एस.पाटील यांना दूरध्वनीवरून दिली.

यानंतर पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पाटील व पोलीस नाईक सुरेश पाटील पाठविले. यानुसार शासकीय वाहनाने दोन्ही कर्मचारी काळगाव जाण्यास निघाले.

म्हसदी गावात पोहोचल्यावर गावातील नागरिकांकडून माहिती मिळाली की, काळगावचे पोलीस पाटील शांताराम पाटील हे म्हसदी येथील ग्रामीण रुग्णालयात आहेत.

देसले यांना भेटून त्यांची चौकशी करून साक्री येथील पोलीस पथक काळगाव येथे गेले. तेथून विनोद जगन्नाथ देसले व भूषण जगन्नाथ देसले यांना ताब्यात घेवून साक्री येथे आणले.

तसेच उपचारानंतर शांताराम देसलेही तेथे पोहोचले. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर मारहाणीचा गुन्हा नोंदविला.

पोलीस पाटील शांताराम देसले त्यांचा मुलगा राकेश व एक अज्ञात इसम यांनी मारहाण केली, असा गुन्हा पोलीस पाटलांचे पुतणे व भाऊ यांच्यातर्फे नोंदविण्यात आला. दोन्ही पक्षांच्या आरोपीतांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना दुसर्‍या दिवशी पुन्हा ठाण्यात हजर होण्याची समज पोलिसांनी दिली.

आज दि 21 रोजी पोलीस ठाण्यात बैठक सुरु असताना अचानक पोलीस पाटील देसले रागात पोलीस ठाण्यातून मध्येच उठून निघून गेले व शहरातून विषारी औषध आणले.

पोलीस ठाण्याच्या आवारात प्राशन केले.पोलीस ठाण्यात पोलिसांनी त्याच्याकडून विषारी औषधाची बाटली हिसकावली. काही प्रमाणात औषध घेतल्याने पोलीस ठाण्यात काही काळ खळबळ उडाली.

त्यांना लगेच साक्री ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. तात्काळ उपचार मिळाल्यामुळे प्रकृतीवरचा धोका टळल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 323,504,506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा द वी 309 चा गुन्हा पोलीस पाटील शांताराम देसले यांच्याविरुद्ध दाखल झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*