कापडणे। दि.20 ।-आजपासुन बरोबर एक वर्षापूर्वी दि.21 सप्टेंबर 2016 रोजी नंदाळे बु.(ता.धुळे) येथे ढगफुटीसमान अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे गावालगतचा इंग्रजकालीन गावतलाव फुटला.

यातील हजारो गॅलन पाणी गावातुन वाहणार्या सापनाल्याव्दारे अचानक गावात शिरले आणि हा-हा म्हणता लाखोंचे नुकसान झाले. यात नंदाळे व परिसरातील सुमारे 316 शेतकर्यांची 500 एकर जमिन व 34 गुरे वाहुन गेली.

तब्बल 144 घरांची पडझड झाली तर 3 विहीरी बुजल्या गेल्या. यात तब्बल सव्वा कोटीचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातुन निष्पण्ण झाले.

850 वर्षापासुन तहान भागविणारा गावतलाव फुटल्याने त्याचदिवशी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. या घटनेनंतर अधिकारी व सर्वपक्षीय नेतेमंडळींची रिघ लागली. मदतीच्या वल्गनाही झाल्या, त्याही मात्र हवेत विरल्या.

वर्षभरात ना तलाव बांधला गेला- ना शेतीसंदर्भातल्या नुकसानीला एक रुपयाची मदत मिळाली. कोडगे झालेले प्रशासन आणि त्याच्या कोरड्या आश्वासनाचा अनुभव या ग्रामस्थांना येतोयं. लालफितीच्या व बाबुगिरीच्या फेर्यातुन नंदाळे व परिसरातील ग्रामस्थांना वाचविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

एक वर्षापूर्वी दि.21 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास नंदाळे बु. परिसरात पावसाला प्रारंभ झाला. काहीवेळाने पावसाचा जोर वाढल्याचे परिसरातील नदी-नाल्यांना पाणी आले.

या ढगफुटीसमान अतिवृष्टीमुळे पाण्याचा दाब वाढला आणि गावाजवळच्या जंगल शिवारातील गावतलावाचा बांध फुटला. मध्यरात्रीनंतर सापनाल्यातुन अचानक गावात घुसले.

झोपेत असलेल्या ग्रामस्थांची यातुन एकच धावपळ झाली. यात असंख्य घराची पडझड झाली. घरांची पडझळ करत या पाण्याने 34 गुरे वाहुन गेली. यानंतर पाणी गावाजवळच्या शेतातुन वाहत गेल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले.

शेतीचे एकेक बांध तोडत पाण्याने सुमारे 500 एकर शेत वाहत नेले. प्रशासनाने तीन टिम करत पंचनामे केले, यात सुमारे सव्वा कोटीचे नुकसान झाल्याचे समोर आल्याने प्रशासन ही बाब गंभीरतेने घेईल असे येथील व परिसरातील ग्रामस्थांना वाटले होते परंतु शासनाची ही आश्वासने हवेत विरली.

शेतीसंदर्भातल्या नुकसानीबाबत प्रशासनाने मात्र सरळ ठेंगा दाखविला. दरम्यान नंदाळे बु. गावातील सप्तश्रृगी माता मंदिराजवळ मध्यरात्री विज पडुन संगम कृष्णा वाघ (वय24) हा तरुण जागीच ठार तर शरद श्रावण पाटील, संदिप पाटील व राहुल राजेंद्र पाटील हे तीन व्यक्ती जखमी झाले होते.

तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असतांना अचानक आलेल्या या संकटाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. तात्काळ भरीव नुकसान भरपाई करण्याची तसेच हा बंधारा दुरुस्तीची मागणी होत असतांना प्रशासनाने मात्र अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

लालफितीच्या व बाबुगिरीच्या या फेर्यातुन काढा अशी मागणी ग्रामस्थ ज्ञानेश्वर पाटील, इंद्रभान पाटील, रमेश पाटील, धोंडू पाटील, अशोक वाणी, विश्वास पाटील, रामा राजपुत, भिकन पाटील, हरिदास पाटील, गोकुळ पाटील, देविदास पाटील, हिरामण पाटील, दत्तू पाटील, प्रदीप पाटील, अजय पाटील, भुषण पाटील, अमोल पाटील आदींनी केली आहे.

शासन गंभीर नाही


नंदाळे अतिवृष्टीची घटना झाल्यानंतर मी घटनास्थळी जावुन तात्काळ पाहणी केली. गावतलावाचे 45 लाखाचे अंदाजपत्रक तात्काळ बनवुन पंचायत समिती स्तरावरुन जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठविले. राज्यभरात सध्या या जलयुक्ततल्या गावांचा सुधारित आराखडा तयार करण्याची कार्यवाही चालू असल्याचे कारण पुढे करत शासन ही कामे लांबवित आहे व त्यामुळे या कामास विनाकारण विलंब होत आहे. दरम्यानच्या काळात पंचायत समिती लघुसिंचन विभागाच्या पुढाकाराने या तलावातुन लोकसहभागाने सुमारे 2 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. यामुळे त्याची हजारांवर घनमीटर जलक्षमता वाढण्यास मदत झाली. तसेच तहसिलदारांना त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देश दिले. सुमारे सव्वा कोटीच्या नुकसानीचे पंचनामे शासनास सादर करुन त्याचा पाठपुरावा करतोय पण शासनाची देण्याची दानतच नाही. नंदाळे व परीसरातील ग्रामस्थांच्या या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरायची तयारी आहे.
– आ.कुणाल पाटील

नुकसान 1 कोटी 20 लाखांचे, भरपाई मात्र शून्य
नंदाळे बचु. गावासह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिरुड व बोरकुंड मंडळातील तब्बल 23 गावांत नुकसान झाले. नंदाळे गावाजवळचा गावतलाव फुटल्याने गावात-शेतीत पाणी घुसले आणि या गावामध्ये शेतीसह विहीरी, जनावरे व घरांचे असे एकुण 1 कोटी, 28 लाख, 41 हजार 400 रुपयाचे नुकसान झाले. या गावांमध्ये 316 बाधीत शेतकरी आहेत. यातील 286 शेतकर्यांच्या 192 हेक्टर क्षेत्रात 33 टक्क्यापेक्षा जास्त तर 19 शेतकर्यांच्या अडीच हेक्टर क्षेत्रात 33 टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. तसेच या गावांमध्ये 144 घरांची पडझड झाली. 34 जनावरे मृत झाली. या अतिवृष्टीमुळे 3 विहीरी बुजल्या गेल्या. तर अतिवृष्टीदरम्यान विज पडुन संगम वाघ या तरुणाचा मृत्यु झाला होता. या घटनेनंतर तीन टिम बनवुन तात्काळ नुकसानीचे पंचनामे तर केले. प्रशासनाचे हे प्रेम मात्र पुतना मावशीचे ठरले. मदतीच्या वल्गना हवेत विरल्या. फुटलेला बंधारा तर झाला नाहीच पण बाधीत शेतकर्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसली गेली. एकुण पडझड झालेल्या घरांपैकी केवळ 15 टक्के घरांना नाममात्र मदत सोडली तर ना पिकांच्या नुकसानीची मदत मिळाली, ना पशुधनाच्या नुकसानीची. घरांचे नुकसान वगळता शेती,गुरे व विहीरी यांचे निव्वळ नुकसान झाले 1 कोटी 20 लाखांचे आणि नुकसान भरपाई मात्र शून्य.
-अमोल पाटील
सामाजिक कार्यकर्ते, नंदाळे

नंदाळे गाव जलयुक्तच्या तिसर्‍या टप्प्यात
जलयुक्त अभियानाच्या तिसर्या टप्प्यात (तिसर्‍या वर्षात) नंदाळे गावाचा समावेश आहे. राज्यभरात सध्या या गावांचा सुधारित आराखडा तयार करण्याची कार्यवाही चालू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर कामासंदर्भात पुढील कार्यवाही होईल. शासन स्तरावरावरील प्रशासकिय बाबी पूर्ण केल्यानंतर त्या कामाचा प्रारंभ होईल. अशाप्रकारेच साक्री तालुक्यातील खुडाने-डोमकाणी येथील घटबारी धरण फुटले होते. त्याचे अंदाजपत्रक 56 लाखांचे तयार करण्यात आले परंतू प्रशासकिय मिळायच्या आधीच तेथील गावकरी एकत्र आले, काही वर्गणी जमा केली. त्याला प्रशासनानेही सहकार्य केले व देशबंधू मंजु गुप्ता फाऊंडेशननेही मदत केली आणि पाहता-पाहता धरण उभे राहिले. अशा रितीने लोकं पुढे येणही गरजेचे आहे. आता प्रत्येक गावाला फक्त साधारण 60 लाख रूपये मिळणार असल्याने आपल्या गावासाठी आपणही प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– गणेश मिसाळ
उपविभागीय अधिकारी, धुळे

LEAVE A REPLY

*