मनपातील सत्ताधार्‍यांना जागा दाखवा !

0

धुळे । दि.16 । प्रतिनिधी-शहरात स्वच्छता होत नसेल तर मनपातील सत्ताधार्‍यांना जागा दाखवा असा सल्ला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान 8 दिवसाच्या आत स्वच्छता दिसली नाही तर अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासून धिंड काढली जाईल. असाही इशारा ना. भामरे यांनी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला दिला.

भाजपातर्फे आज शहरातील प्रभाग क्र. 29 मध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी ना.डॉ.सुभाष भामरे, माजी नगरसेवक हिरामण गवळी, भिकन वराडे, ओम खंडेलवाल, मंडळ विभागाचे जीवन शेंडगे, सचिन सेवतकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी प्रभाग क्र. 29 च्या पवन नगरातील रहिवाशांनी डॉ. भामरे यांना घेराव घातला व या प्रभागातील नगरसेवक वार्डात फिरकलेच नाहीत.

निवडणूकीच्यावेळी सिंगापूर प्रमाणे प्रभाग करण्याचे आश्वासन संबंधित नगरसेवकांनी दिले होते पण आज या प्रभागातील गटारी तुडुंब भरल्या आहेत.

स्वच्छता प्रभागात होत नाही. नागरीक नरकयातना भोगत आहेत. महापालिकेकडे तक्रारी करण्यासाठी गेल्यास उडवाउडवीचे उत्तरे मिळतात.

मग तक्रार करायची कोणाकडे? असा प्रश्न थेट संरक्षण मंत्र्यांना प्रभागातील नागरीकांनी विचारला. यामुळे ना.भामरे हे भडकले.त्यांनी जागेवरच संबंधित स्वच्छता निरीक्षकाला बोलावले. त्याला खडेबोल सुनावले.

येत्या आठ दिवसात स्वच्छता झालेली दिसून आली नाही तर मी स्वत: तुमच्या तोंडाला काळे फासून धिंड काढेल असा इशाराही ना. भामरे यांनी स्वच्छता निरीक्षकाला दिला.

महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन ना. भामरे यांनी संपर्क साधून त्यांनाही सुनावले. शहरातील स्वच्छतेकडे लक्ष द्या, महापालिकेचा कारभार व्यवस्थीत चालवा असाही सल्ला ना. भामरे यांनी आयुक्तांना दिला.

दरम्यान, आंदोलनात सौ. मिथिलेस गुप्ता, गंगुबाई चौधरी, मिरा पाटील, कैलास शेवतकर, सुरेश बारी, राधेश्याम वर्मा, नथ्थु गुजर, अरुण दुसाणे यांच्यासह अन्य नागरीक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*