669 ग्रा.पं.मध्ये विद्युत व्यवस्थापक नेमणार ! – उर्जामंत्री

0

धुळे । दि.15 । प्रतिनिधी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकर्‍यांनी सौरऊर्जा प्रकल्पासाठी गट तयार करून स्वत:च वीज तयार करुन या विजेचा वापर करावा.

त्यामुळे जिल्ह्यात 327 दिवस सौरऊर्जा प्राप्त होवू शकेल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 679 ग्रामपंचायतींमध्ये विद्युत व्यवस्थापक नेमणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.

दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना तसेच एकात्मिक ऊर्जा विकास योजना अंतर्गत प्रस्तावित 33 केव्ही उपकेंद्र दुसाणे, उमरपाडा, ता. साक्री, नांद्रे, सौंदाणे, ता. धुळे, आरावे, दलवाडे, ता. शिंदखेडा, रोहिणी, ता. शिरपूर, चाळीसगाव रोड,चक्करबर्डी, भोकर, देवपूर, ता. धुळे या उपकेंद्रांचे ई भूमीपूजन समारंभ छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर कल्पना महाले, खासदार डॉ. हीना गावित, आ. अनिल अण्णा गोटे, आमदार डी. एस. अहिरे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.

ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, महापारेषणचे काम ग्राहक केंद्रीत आहे. त्यामुळे ग्राहकाला 24 तास उपलब्ध असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या समस्या तत्काळ सोडविणे आवश्यक आहे. त्यामुळे शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांनी महिन्यात एक वेळेस ग्राहकांशी संवाद केला पाहिजे. आता महावितरणचे मोबाईल प उपलब्ध आहे. त्याच्या माध्यमातून ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध होवू शकतील.

महापारेषणच्या माध्यमातून 431 कोटी रुपये खर्चाची योजना तयार करण्यात आली आहे. तसेच बळसाणे, ता. साक्री येथे 400 केव्ही क्षमतेचे केंद्र कार्यान्वित करण्यात येईल, असेही ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 679 ग्रामपंचायतींमध्ये विद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्यात येतील. ही कार्यवाही लवकरच सुरू होईल. त्यामुळे ग्रामस्थांना विद्युत कामे करणारा हक्काचा व्यक्ती मिळेल.

तसेच रोजगाराची उपलब्धता होईल. तसेच इलेक्ट्रीक विषयात पदवी, पदविका घेणार्‍या बेरोजगारांना ठेकेदाराचा परवाना देण्यात येतील. त्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असेही मंत्री श्री. बावनकुळे यांनी आवाहन केले.

प्रत्येक गावपाड्यापर्यंत वीज पोहोचविण्यासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गावागावात ग्रामरक्षक दल नियुक्त करण्यात येणार आहे. या दलांना अवैध दारू बंद करण्याचे अधिकार असतील, असेही ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात 80 हजार विहिरींचे काम सुरू आहे. त्यातून पावणे तीन लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

त्यामुळे या विहिरींनाही वीज जोडणी तत्काळ मिळावी, असेही त्यांनी नमूद केले. आ. गोटे म्हणाले, धुळे शहरात भूमिगत केबल टाकण्यात यावी.

तसेच रस्त्यात येणार्‍या डीपी व पोल हटविण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना द्यावेत, असे सांगितले. यावेळी खा. डॉ. गावित, आमदार श्री. अहिरे, महापौर श्रीमती महाले यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य अभियंता श्री. जनवीर यांनी प्रास्ताविक केले. जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

*