धुळे-नंदुरबार जि.स.नो.स.बँक चौकशीसाठी संचालकांना नोटीस

0
धुळे । दि.6 । प्रतिनिधी-धुळे-नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या संदर्भात संचालकांची चौकशी सुरु झाली असून या संदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत.

बँकेतील कथीत भ्रष्टाचारप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीसंदर्भात नाशिक येथील विभागीय सहनिबंधक मिलींद भालेराव यांनी रिझर्व्ह बँक व सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या निर्देशानुसार ही चौकशी करण्याबाबतचे आदेश काढले आहेत.

कलम 83, 81 (3) (क), कलम 81 (6), कलम 88 (1) अन्वये चौकशी करण्याबाबत वेगवेगळ्या अधिकार्‍यांची नियुक्ती करुन आदेश दिले आहेत. 28 ऑगस्ट 2017 रोजी संबंधित संचालकांना या संदर्भात नोटीस बजावण्यात आली असून बँकेत झालेल्या नुकसानीसंबंधी चौकशी करुन नुकसानीस जबाबदार संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याबाबत व कार्यवाही करण्यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत.

सहकार आयुक्त व सहकार निबंधक, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदरचे कामकाज चालवावे, असेही सूचविण्यात आले आहे. प्राधिकृत चौकशी अधिकारी जे.के.ठाकूर यांनी संचालकांना या संदर्भात नोटीस बजावली आहे.

दि.15 सप्टेबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित संचालकांनी आपला लेखी खुलासा कार्यालयात प्रत्यक्ष येवून सादर करावा. अन्यथा पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे नोटीसीत म्हटले आहे.

दरम्यान, या संदर्भात चौकशी होवून संबंधितांना नुकसानीस जबाबदार धरण्यात यावे, यासाठी राजेंद्र शिंत्रे यांनी आज प्राधिकृत चौकशी अधिकारी जे.के.ठाकूर यांना पत्र सादर केले.

 

LEAVE A REPLY

*