महापालिकेतर्फे आठ ठिकाणी विसर्जन व्यवस्था

0
धुळे । दि.1 । प्रतिनिधी-महापालिकेतर्फे आठ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून हत्तीडोह येथे तात्पुरता बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले आहे.
या ठिकाणी मोठ्या मूर्तींचे विसर्जन करावे, अशी माहिती महापौर सौ.कल्पना महाले यांनी दिली आहे. दरम्यान, महापौर व अन्य पदाधिकार्‍यांनी आज हत्तीडोहाची पाहणी केली.

गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी आज महापौर सौ.कल्पना महाले यांनी बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त सुधाकर जाधव व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महापौर कल्पना महाले या बोलत होत्या.

पुढे बोलतांना सौ.महाले म्हणाल्या की, पांझरा नदीला पाणी नाही. यामुळे पांझरा नदीकिनारी विसर्जनस्थळी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात येणार आहेत. त्या टाक्यांमध्ये भाविकांनी मूर्तीचे विसर्जन करावे. निर्माल्य संकलन व मूर्ती संकलनासाठी महापालिकेतर्फे कर्मचार्‍यांचे पथके तयार करण्यात आली आहेत.

हे कर्मचारी मूर्ती व निर्माल्य संकलीत करणार आहेत. तसेच वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्ती करण्यात येत असून विसर्जन मार्गांवर आणि विसर्जनाच्या ठिकाणी प्रकाशझोताची व्यवस्था करण्यात येईल. आठ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

पांझरा नदी कोरडी ठणठणीत आहे. त्यामुळे हत्तीडोह येथे पाणी अडविण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधण्यात आला असून या ठिकाणी मोठ्या मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन सौ.महाले यांनी केले.

या बैठकीला स्थायी सभापती कैलास चौधरी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.इंदुबाई वाघ, सभागृह नेते अरशद शेख, नगरसेवक चंद्रकांत सोनार, अभियंता कैलास शिंदे, सहाय्यक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी, स्वच्छता निरीक्षक दिलीप वाघ, अग्निशमन अधिकारी तुषार ढाके, विद्युत अभियंता एन.के.बागूल, कनिष्ठ अभियंता विसपुते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*