‘जयहिंद’च्या जागेबाबत आरक्षण बदलास मान्यता

0
धुळे । दि.31 । प्रतिनिधी-जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट या जागेतील रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे आर्थिक व व्यवहारीक दृष्ट्या सदर रस्त्याचे आरक्षण वगळणे योग्य होणार आहे. तरी सदर आरक्षण बदलाची कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे सभागृहात महापौर सौ. कल्पना महाले यांनी सांगितले.
महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर सौ. महाले यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी देवपूर वाडीभोकर रोडपासून उत्तरेकडे जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट या जागेतील जाणारा मंजूर विकास योजना रस्ता रद्द करण्याबाबतचा विषय सभागृहात चर्चेला आला. या चर्चेत प्रतिभा चौधरी, संजय गुजराथी, चंद्रकांत केले, साबीर मोतेब्बर यांनी सहभाग घेतला. सुमारे एक तास याविषयावर सभागृहात खल चालला.

या विषयावर बोलतांना महापौर सौ. महाले म्हणाल्या की सदर प्रस्तावित रस्ता हा जयहिंद संस्थेच्या खाजगी जागेतून जात आहे. सदर ठिकाणी संस्थेच्या शैक्षणिक इमारती अस्तित्वात आहे. सदर संस्था ही उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे.

रस्ता ताब्यात घेण्यासाठी प्रथम जागेचे भूसंपादन करावे लागेल व त्यासाठी आर्थिक मोबदला द्यावा लागेल. तसेच सदर रस्ता हा पुढे सलग्न ठेवणे आवश्यक आहे. कारण हा रस्ता मुस्लीम कब्रस्तानातून सलग्न होणार आहे. धुळे शहर मंजूर विकास योजना सन 2013 मध्ये प्रस्तावित झाला असून सन 2015 मध्ये अंतिम करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

सदर योजना प्रस्तावित करण्यापुर्वी सदर ठिकाणी जयहिंद संस्थेची अस्तित्वातील इमारतीचे बांधकाम झालेले होते व सद्यस्थितीतील मुस्लीम कब्रस्तानही अस्तित्वात होते. याबाबत नगररचना विभागाकडून सर्व्हेक्षण करतांना एक्सीटींग लॅण्ड युज तपासून डीपीमध्ये प्रस्तावित करणे आवश्यक होते.

या प्रमाणे कार्यवाही न झाल्याने प्रत्यक्ष बांधकाम झाल्याच्या ठिकाणी रस्ता प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत सदर रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे आर्थिक व व्यवहारीक दृष्ट्या सदर रस्त्याचे आरक्षण वगळणे योग्य होणार आहे. तरी सदर आरक्षण बदलाची कार्यवाही करण्यास मान्य देण्यात येत आहे. प्रशासनाने पर्यायी रस्त्यासाठी तातडीने जागेचा शोध घ्यावा असे महापौरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*