महासभेत गाजला आरोग्य, पथदिव्यांचा विषय

0

धुळे । दि.31 । प्रतिनिधी-शहरात डेंग्यूची साथ पसरली आहे, परंतु आरोग्य विभागाकडून खोटे कागदपत्र रंगवले जातात. तर ऐन गणेशोत्सव काळात शहरातील पथदिवे बंद आहेत. यामुळे महापालिकेच्या सभागृहात सदस्यांनी नाराजी व्यक्त करुन अधिकारी व कर्मचार्‍यांवर आयुक्तांचा वचक राहिलेला नाही, असाही आरोप सभागृहाने केला.

महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महापौर सौ.कल्पना महाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्त सुधाकर देशमुख हे प्रशासकीय कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्यामुळे सभेचे प्रशासकीय कामकाज उपायुक्त जाधव यांनी पाहिले.

पॅथॉलॉजी लॅब
येथील रोटरी क्लब या सामाजिक संस्थेतर्फे धुळे मनपा सुतिकागृह प्रयोग शाळेमध्ये पॅथॉलॉजी सुरु करण्याचा विषय चर्चेला आला. या विषयावर महापौर सौ.कल्पना महाले म्हणाल्या की, शहरातील सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी आवश्यक असलेला प्रस्ताव महापालिकेकडे आला आहे. रोटरी क्लब संस्थेने पॅथॉलॉजी सुरु करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना अल्पदरात ना नफा ना तोटा या तत्वावर आरोग्य चाचण्या करण्यासाठी सोय होणार आहे. रोटरी क्लब यांच्या सहकार्‍याने मनपा सुतिकागृहात पॅथॉलॉजी सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. याबाबत आवश्यक त्या अटी, शर्ती प्रशासनाने तपासून घ्याव्यात व आकारण्यात येणार्‍या शुल्क शासकीय दराप्रमाणे मनपाने वसुल करावी व प्रस्ताव अंमलबजावणीपूर्वी महापौरांना अवगत करावे, असे त्यांनी सांगितले.

रुग्णवाहिका देणार
ग्रामीण भागातील नागरिकांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा विषय सभागृहात चर्चेला आला. या चर्चेत मायादेवी परदेशी, साबीर मोतेब्बर, जयश्री अहिरराव, संजय गुजराथी यांनी सहभाग घेतला.
मनपा हद्दीतील रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण दाखल होतात. त्यांना आपतकालिन स्थितीत मुंबई, पुणे, नाशिक येथील रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागते. अशा परिस्थितीत रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. यापूर्वी महापालिकेमार्फत फक्त शहर हद्दीतील नागरिकांनाच रुग्णवाहिकेचा लाभ देण्याचा ठराव झाला आहे. तथापि, सद्य:स्थिती लक्षात घेता ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकासेवा यापूर्वी झालेल्या अटी व शर्ती व दरानुसार उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच शहर हद्दीतील रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात येवून ग्रामीण भागातील रुग्णांकडून ना नफा ना तोटा या तत्वावर दर आकारणी करण्यात यावी. प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा तसेच शहरातील इतर रुग्णांसाठी त्याप्रमाणे दर आकारणी करावी, अशी सूचना महापौर सौ.महाले यांनी दिली.

नवरंग जलकुंभ
नवरंग पाण्याच्या टाकीच्या आवारात 20 लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ सध्या प्रस्तावित असलेल्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत करण्यासंदर्भाचा विषय चर्चेला आला. या चर्चेत बंटी मासोळे, जिभाऊ बोरसे यांनी सहभाग घेतला.
देवपूर भागासाठी असलेल्या नवरंग जलकुंभाची सद्य:स्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी नवीन जलकुंभ बांधणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नवीन 20 लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ बांधण्याचे काम युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर योजनेतून होणार्‍या बचतीच्या रकमेतून सदर काम करुन घेण्यात यावे. सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेण्याबाबतची त्वरित कार्यवाही व्हावी, असा आदेश महापौर सौ.महाले यांनी दिला.

मानधनात वाढ
राज्यातील बृहमुंबई व इतर महापालिकेतील सदस्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. हा विषय चर्चेला आला. या विषयाला मंजुरी देण्यात आली.
शासन निर्णयानुसार नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच वाढीव मानधनाची रकम शासननिर्णयाच्या नुसार देय राहिल, असे महापौर महाले यांनी सभागृहात सांगितले.

पाणीपुरवठ्याची कामे
नागरी दलितवस्ती पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा केंद्रावरील आवश्यक कामे करण्यासाठी येणारा खर्च 3200878 रुपयास प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय चर्चेला आला. या विषयाला मंजुरी देण्यात आली.
सदर कामे ही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमीत होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा केंद्रावरील आवश्यक कामे करण्यासाठी येणारा खर्च 3200878 रुपयास प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे महापौरांनी सांगितले.

बीओटी प्रस्ताव
महापालिकेच्या मालकीच्या जागांवर बीओटी प्रस्ताव करण्यासाठी आरक्षण बदलातील प्रस्तावास अंतिम मान्यता देवून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या विषयाला सभागृहाने मंजुरी दिली.
प्रस्तावातील जागांवर व्यापारी संकुल बीओटी तत्वांवर बांधण्याबाबत आरक्षणात फेरबदल करण्यासाठी यापूर्वी ठराव पारित करण्यात आलेला आहे. सदर जागा मनपाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या आरक्षणात फेरबदलाबाबत हरकती, सूचना मागविण्यात आलेल्या असून यावर कोणत्याही हरकत सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सदर प्रस्तावास अंतिम मंजुरीसाठी शासनास सादर करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे महापौर सौ.कल्पना महाले यांनी सभागृहात सांगितले.

 

LEAVE A REPLY

*