25 नवीन तलाठी सजा कार्यालये मंजुर

0
बोराडी । दि.27 । प्रतिनिधी-शिरपूर तालुक्यासाठी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला तलाठी सजा कार्यालयांचा प्रश्न निकाली लागला असून शिरपूर तालुक्यासाठी नव्याने 25 सजा कार्यालयांना शासनाने मंजुरी दिली आहे.
यापूर्वी शिरपूर तालुक्यात 39 तलाठी सजा कार्यालय कार्यरत होते. आता नवीन निर्णयानुसार शिरपूर तालुक्यातील तलाठी सजा कार्यालयांची संख्या 64 करण्यात आलेली आहे.
शासनाच्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचे शिरपूर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरपूर तालुका हा आदिवासी बहुल वस्ती असलेला तालुका असून तालुक्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे.

मात्र मागील अनेक वर्षापासून तलाठी सजा कार्यालयांची संख्या वाढविण्यात आलेली नव्हती. शासनाने 2010 साली नवीन तलाठी सजा कार्यालयांना मंजुरी देण्याचे प्रस्ताव सादर करणेबाबत सूचित केलेले होते.

मात्र या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नव्हते. भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी पाठपुरावा करून पर्यटन व रोहयो मंत्री ना.जयकुमार रावल व खा.डॉ हिनाताई गावित यांच्या माध्यमातून हा विषय प्रशासकीय स्तरावर तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

त्यानुसार जिल्हाधिकारी धुळे दिलीप पांढरपट्टे यांनी दि.2 ऑगस्ट रोजी अधिसूचना जाहीर करून शिरपूर तालुक्यासाठी नवीन 25 तलाठी सजा कार्यालयांना मंजुरी दिल्याचे जाहीर केलेले आहे.

शिरपूर तालुक्यात पुढील प्रमाणे नवीन तलाठी सजा कार्यालयांना मंजुरी मिळालेली आहे. शिरपूर खुर्द, शिरपूर बुद्रुक, वरवाडे, शिंगावे, गरताड व ताजपुरी मिळून गरताड, कळमसरे व अजंदे खुर्द मिळून कळमसरे, अहिल्यापूर व तांडे मिळून अहिल्यापूर, होळनांथे व अजंदे बुद्रुक मिळून होळनांथे, भावेर व पिंपळे मिळून भावेर, बभळाज व तरडी मिळून बभळाज, अर्थे बुद्रुक, अर्थे खुर्द, तर्‍हाड कसबे व जळोद मिळून तर्‍हाड कसबे, मुखेड व उखळवाडी मिळून मुखेड, फत्तेपूर बोरपाणी व चाकडू मिळून फत्तेपूर, मालकातर व गधडदेव मिळून मालकातर, निमझरी वरझडी मिळून निमझरी, वकवाड झेंडेअंजन दुर्बळ्या मिळून वकवाड, पळासनेर व हेन्द्राय मिळून पळासनेर, पनाखेड खैरखुटी व हातेड मिळून पनाखेड, सुळे चिलारे फत्तेपूर (क) लाकड्या हनुमान मिळून सुळे, खामखेडा प्र.आ हिगाव हिवरखेडा मिळून खामखेडा, आंबे बोरमळी वडेल खुर्द मिळून आंबे, भिलटदेव जामन्यापाडा धवळीविहीर मिळून भिलटदेव, मोहिदा शेमल्या काकडमाळ मिळून मोहिदा, वाडी बु. व वाडी खुर्द मिळून वाडी, नांदर्डे वासर्डी मिळून नांदर्डे, थाळनेर 1, थाळनेर 2, न्यू बोराडी व टेंभेपाडा मिळून न्यू बोराडी अशा 25 नवीन तलाठी सजा कार्यालयांना फोड, पुनँरचना करून मंजुरी देण्यात आलेली आहे.

याबाबत नागरिकांना काही आक्षेप असल्यास दि.31 ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे हरकत दाखल करण्याची देखील मुदत देण्यात आलेली आहे.

दैनंदिन जीवनात ग्रामीण भागातील जनतेला तलाठी कार्यालयाशी निकटचा संबंध येतो. मात्र तलाठी सजा कार्यालयांची मर्यादित संख्या असल्याने एकाच तलाठीकडे अनेक गावांचा कार्यभार दिलेला असतो.

त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या तलाठी सजा कार्यालयांमुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

म्हणून शिरपूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शासनाच्या या अधिसूचनेचे स्वागत करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*