‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ शो चे सोमवारी आयोजन

0
धुळे । दि.25 । प्रतिनिधी-स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पंचायत समितीतर्फे धुळे व साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा विशेष खेळ दि.28 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत येथील मनोहर चित्रमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा कक्षाकडून वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. त्यात प्रामुख्याने विविध कार्यशाळा, गवंडी प्रशिक्षण, प्रचार-प्रसिध्दी, हागणदारीमुक्त गाव निर्मूलन कार्यक्रम, गुड मॉर्निंग पथक आदींचा समावेश आहे.

त्याचा परिणाम म्हणून जिल्हयाच्या हगणदारीमुक्तीची टक्केवारी 70 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे.अभिनेते अक्षयकुमार यांची प्रमुख भूमिका असलेला ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ हा चित्रपट सध्या गाजतो आहे.

वैयक्तीक शौचालय बांधकाम व कुटूंबाची होणारी अवहेलना या विषयावरील हा प्रभावी चित्रपट सध्या जनमानसात लोकप्रिय होत आहे.जनजागृतीचे प्रभावी माध्यम चित्रपटाकडे पाहिले जाते.

जिल्हयातील स्वच्छता चळवळीला गती मिळावी व हागणदारीमुक्तीच्या कार्यात पदाधिकारी व सदस्यांचा सक्रीय सहभाग वाढीस लागावा, याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी यांनी सदर चित्रपट जिल्हयातील 550 ग्रामपंचायतींमधील सरपंच व ग्रामसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना दाखविण्याची सूचना जिल्हा कक्षाकडे केली.

त्यानुसार जिल्हा कक्षाने आवश्यक तो निधी पंचायत समिती स्तरावर वितरीत केला आहे. साक्री येथे चित्रपटगृह नसल्याने साक्री व धुळे तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी पंचायत समिती धुळे व साक्रीतर्फे ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा विशेष खेळ सोमवारी दि.28 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत येथील मनोहर चित्रमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

यासाठी संबधितांना पत्राव्दारे निमंत्रित करण्यात आले आहे. विशेष खेळास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती सभापती, उपसभापती यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. सरपंच, ग्रामसेवक व सन्मा. जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी या चित्रपटाच्या विशेष खेळास उपस्थित रहावे, असे आवाहन धुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. सी.के. माळी व गटविकास अधिकारी श्री. चंद्रकांत भावसार यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*