स्वाईन फ्ल्यू व डेंग्यूचे रुग्ण आढळले

0
धुळे । दि.24 । प्रतिनिधी-शहरात स्वाईन फ्लू व डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. या दोन्ही आजारांचे रुग्ण शहरात आढळून आले आहेत. एका खासगी रुग्णालयात हे रुग्ण उपचार घेत आहेत.
अधुनमधून येणार्‍या पावसामुळे शहरात साथीचे आजार पसरले आहेत. शहरात एका खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले.

संबंधित रुग्णांच्या थुंकीचे नमुने हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता दोघांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. साक्री रोडवरील नवजीवन शाळा परिसर आणि चावरा इंग्लिश मेडियम स्कूल परिसरातील हे रुग्ण आहेत.

स्वाईन फ्लूसह डेंग्यूचाही रुग्ण शहरात आढळला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या वर्षी 417 संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते.

त्यापैकी 105 जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मलेरियाचे 33 हजार 872 नमुने हिवताप विभागाने घेतले होते. त्यापैकी दोन जणांना मलेरिया झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

शहरात साथीचे आजार पसरले आहेत, परंतु महापालिका आरोग्य विभाग मात्र अनभिज्ञ आहे. अद्याप शहरात फवारणी, धुरळणी करण्यात आलेली नाही.

मात्र, सदरची मोहिम कागदावर दाखविण्यात आलेली आहे. शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग पडलेले आढळून येत आहेत.

तसेच गटारींची स्वच्छताही केली जात नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. शहरात हिवताप पसरण्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*