बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठ गजबजली

0
धुळे । दि.23 । प्रतिनिधी-गणरायचे आगमन अवघ्या एका दिवसांवर येवून ठेपले असून शहरात गणेश मुर्ती विक्रीसाठी दुकाने सजली आहेत. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी साहित्य विक्रीची दुकाने थाटली असून बाजारपेठ गजबजली आहे.
सर्वांचा आवडता गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येवून ठेपला आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे.
तसेच विविध रुपांमध्ये व आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. अनेकांनी आतापासून गणरायांच्या मूर्तीची बुकिंग केली आहे.

गणरायांच्या आरासासाठी लागणारे साहित्यदेखील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसेच तयार मखरीदेखील बाजारात विक्रीस आल्या आहेत.

गणरायांचा मुक्काम बारा दिवस असल्यामुळे आकर्षक स्वरुपात घरोघरी व मंडळाकडून स्थापना केली जाते त्या ठिकाणी विद्युत रोषणाई केली जाते त्यासाठी लागणारे साहित्य व तयार विद्युत माळ बाजारपेठेत विक्रीस आले आहेत.

चौकाचौकात मंडप उभारण्यात आले असून घरोघरी सजावट करण्यात आली आहे. पुजेच्या साहित्यासह सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली.

गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. गणेश मंडळांनी उत्सवाची तयारी पूर्ण केली असून विघ्नहर्त्यांच्या स्वागतासाठी धुळेनगरी सज्ज झाली आहे. दि.25 ऑगस्ट रोजी गणेश चतुदर्शीला लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात येणार आहे.

शहरातील फुलवाला चौक, संतोषीमाता चौक, दत्तमंदीर यासह अन्य ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. बाजारपेठेत विविध आकारातील रंगातील गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

त्यात मुंबईच्या लालबागच्या राजापासून ते दगडूशेठ हलवाई, कृष्णावतार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गणेशमूर्तीचा समावेश आहे.

त्याशिवाय जास्वंद फुल, पान, शंख, चौरंग, सूर्यफुल अशा प्रकरातील विविधारंगी गणेश मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शंभर रुपयांपासून ते 71 हजारांपर्यत गणेश मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक व्यवस्था अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

ठिकठिकाणी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी बंदोबस्तांसाठी तैनात करण्यात आले आहे. बाजारपेठेत गणेशमूर्तींसह पुजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती.

शहरातील फुलवाला चौक, संतोषीमाता चौक, दत्तमंदीर यासह अन्य ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत.

 

LEAVE A REPLY

*