कुष्ठरोग अभियान : रुग्णांवर उपचार करा !

0
धुळे । दि.23 । प्रतिनिधी-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या प्रगती योजनेत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान धुळे जिल्ह्यात 5 ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत राबविण्याचे निर्देश आहेत.
त्यानुसार कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.बाळासाहेब चव्हाण, डॉ.आर.व्ही.पाटील, डॉ.महेश मोरे, कमलेश चव्हाण आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, राज्यातील 22 जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहेत. त्यात धुळे जिल्ह्याचा समावेश आहे.

राष्ट्रीय कुष्ठ रोग निर्मूलन कार्यक्रमाबाबत जनजागृती करावी. समाजात लपून राहिलेले कुष्ठ रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी कृती आराखडा तयार करावा. कुष्ठ रुग्ण शोध अभियान पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर राबवावे.

निवडलेल्या पथकांद्वारे 14 दिवस घरभेटीद्वारे सर्वेक्षण करावे. अभियानात पूर्वतयारी व अभियान कालावधीत पर्यवेक्षणासाठी केंद्रस्तरीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पथके भेटी देवून पाहणी करतील.

सर्वेक्षणाचे अहवाल अभियानाच्या कालावधीत रोज 5 वाजेपर्यंत पाठवावेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी नमूद केले.

कुष्ठ रुग्ण शोध अभियानात आशा स्वयंसेविका व एक पुरुष कर्मचारी किंवा स्वयंसेवक असेल. 14 दिवस सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात एका पथकामार्फत किमान 20 घरांचे, तर नागरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*