धुळे तालुका दुष्काळी जाहीर करा !

0
धुळे । दि.19 । प्रतिनिधी-पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत.सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धुळे तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे तालुक्यात टंचाई जाहिर करून त्यावर तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाव्दारे आ.कुणाल पाटील यांनी केली आहे.

आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने धुळे तालुक्यात टंचाई जाहिर करून त्यावरील उपाययोजना कराव्यात अशी मागणी तालुक्यातील शेतकरी आणि पदाधिकार्‍यांसमवेत आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी आ. पाटील यांनी तालुक्यातील पिक परिस्थिती तसेच पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा पाण्याच्या स्थितीबाबत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याशी चर्चा केली.

त्यात आ.पाटील यांनी सांगितले की, धुळे तालुक्यातील टंचाई आणि दुष्काळसदृश्य गावांना भेटी दिल्या तेथील शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन करपलेली व पाण्याअभावी वाढ खुंटलेली आहे, काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही उपयोग झाला नाही, गावागावात पिण्याच्या पाण्याची व चार्‍याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

आता पाऊस आला तरीही खरीप हंगामातील पिकांसाठी त्याचा कोणताही उपयोग होणार नाही. सर्वच पिके हातातून गेलेली आहेत.

त्यामुळे तालुक्यात टंचाई जाहिर करून दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजनांची त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेत केली. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी आणि पदाकिधार्‍यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर केले.

त्यात तालुक्यातील सर्व पिकांचा त्वरीत पंचनामा करावा, दुष्काळी परिस्थितीची पहाणी करून केंद्र व राज्य शासनाच्या अधिकार्‍यांच्या पथकास टंचाई आढावासाठी बोलविण्याबाबत कार्यवाही करावी, सर्व शेतकर्‍यांचा शेतसारा माफ करून तालुक्यात रोहयोची कामे सुरू करावीत, शेतकर्‍यांचे शेतीपंपाचे विज बिल आणि पाणी पुरवठा योजनांचे विज बिल माफ करावे, मागील कर्ज माफ करून शेती पिक कर्ज, शैक्षणिक कर्ज पुनर्गठण करण्यात यावे, संपूर्ण तालुक्यात 50 पैशाच्या आत आणेवारी लावावी, गुरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, टंचाई आराखड्याला मुदतवाढ द्यावी, पाणी टंचाई असणार्‍या गावांना त्वरीत पाण्याचे टँकर सुरू करावेत, बोअरवेल्स, विहीरींचे अधिग्रहण करण्यात यावे अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी आ.कुणाल पाटील, जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, कृऊबा सतिमीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, दुध संघाचे चेअरमन वसंत पाटील, कृऊबाचे उपसभापती रितेश पाटील, पं.स. उपसभापती, दिनेश भदाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, कृषी भूषण भिका पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी, माजी समाजकल्याण सभापती शांताराम राजपूत, कृऊबा समितीचे संचालक राजेंद्र भदाणे, माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, जि.प.सदस्य के.डी. पाटील, किरण अहिरराव, संचालक विजय देवरे एन.डी. पाटील, अशोक सुडके, सोमनाथ पाटील, पं.स.सदस्य प्रमोद भदाणे, मुकटी पं.स. सदस्य छोटूभाऊ चौधरी, प्रभाकर गवळे, माजी पं.स.सदस्य शिरीष सोनवणे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हर्षल साळुंके, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव पाटील, माधवराव पाटील,यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*