नवलनगर येथे शेतकर्‍यावर हल्ला; नऊ जणांवर गुन्हा

0
धुळे । दि.19 । प्रतिनिधी-नवलनगर येथे गाळा सील करण्यावरुन शेतकर्‍यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी 9 जणांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नवलनगर ग्रामपंचायत शॉपींग कॉम्प्लेसमध्ये महेंद्र नामदेव पाटील यांनी गाळा नंबर 11 हा भाड्याने घेतलेला आहे.

सदर ठिकाणी जाण्याचा जीना ग्रा.पं.मार्फत तोडण्यात आला. त्यानंतर महेंद्र पाटील यांनी स्वखर्चाने लोखंडी जीना तयार करुन घेतला. त्याचे बिल ग्राम पंचायतीला सादर केले.

तसेच त्यांच्या शेतातील डाळींबाचे बिल ग्रा.पं. कार्यालयात आलेले आहे. परंतू सदरचे बिल ग्रा.पं.ने अद्याप अदा केलेले नाही.

त्यामुळे पाटील यांनी गाळ्याचे भाडे ग्रामपंचायतीकडे भरलेले नाही. त्यामुळे ग्रामसेवक एस.बी.बोरसे हे सील करण्यासाठी आले.

त्यामुळे ज्ञानेश्वर पुंडलिक पाटीलसह 9 जण हातात हॉकीस्टीक, लोखंडी पास आणि लोखंडी सळई घेवून आले. त्यांनी महेंद्र पाटील यांच्यावर हल्ला करुन त्यांना हाताबुक्क्यांनी व हॉकीस्टीक, लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले.

याबाबत महेंद्र पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 143, 147, 148, 149, 323 प्रमाणे ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील, दशरथ भिका पाटील, सचिन दशरथ पाटील, कैलास आप्पा थोरात, गोविंद भगवान पाटील, संतोष मोतीराम गोपाळ, रोहिदास मोतीराम गोपाळ, खुशाल दुला भिल आणि सुरेश शिवाजी पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोनि दिवानसिंग वसावे हे करीत आहेत.

तरुणी बेपत्ता- शहरातील देवपूर परिसरात असलेल्या भिडेबाग येथून दीक्षा विलास पाटील (वय20) ही विवाहिता दुकानावर साबण घेवून येते असे सांगून गेली ती घरी परत आली नाही. याबाबत विलास यशवंत पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली.

प्लॉट खरेदीत फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा
प्लॉट खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शिरपूर शहरातील भगवत पार्क येथे राहणार्‍या सौ. मिना प्रल्हाद महाजन यांनी वरवाडे शिरपूर नगर परिषदेच्या हद्दीत सर्व्हेनंबर 31 व 30 जमिन करार करुन घेतली व त्यांच्याकडून 35 लाख रुपये बयाणा रक्कम घेतली परंतू जमिन ठरल्याप्रमाणे न देता सुनिल वासुदेव गुप्तासह तिघांनी फसवणूक केली अशी फिर्याद सौ. मिना प्रल्हाद महाजन यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 420, 406, 34 प्रमाणे सुनिल वासुदेव गुप्ता, बबिता सुनिल गुप्ता आणि अविनाश वासुदेव गुप्ता यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई एम.व्ही.गुजर हे करीत आहेत.

नगरसेविकेला दमदाटी गुन्हा दाखल
धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगरात पाळीव कुत्र्याने घरासमोर लघुशंका केली याचा राग येवून नगरसेविकेला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एका महिलाविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगरात नगरसेविका चंद्रकला माणिक जाधव या राहतात. त्यांनी कुत्रा पाळला आहे. सदर कुत्र्याने दि. 18 रोजी सकाळी 8.30 वाजता विमलबाई फकिरा मोरे यांच्या घरासमोरील अंगणात लघुशंका केली. याचा राग विमलबाई मोरे यांना आला व त्यांनी नगरसेविका चंद्रकला जाधव यांच्या घरासमोर येवून त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ व दमदाटी केली याबाबत चंद्रकला जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 504, 506 प्रमाणे विमलाबाई मोरे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडले

देवपूरातील ज्ञानदीप कॉलनीत राहणारे आयटीआयचे सेवानिवृत्त शिक्षकाच्या घराचे कुलूप कडीकोयंडासह उघडून चोरट्यांनी डल्ला मारला. यात किती रुपयाचा ऐवज गेला हे समजू शकले नाही याबाबत पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, शहरातील देवपूर परिसरात असलेल्या ज्ञानदीप कॉलनीत प्लॉट नं. 23 येथे आयटीआयचे सेवानिवृत्त शिक्षक संजयसिंग कृष्णसिंग गिरासे हे राहतात ते त्यांच्या पुतण्याच्या अ‍ॅडमिशनसाठी परिवारासह पुण्याला गेले होते. ती संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप कडीकोयंड्यासह तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील एका खोलीत असलेले कपाटाचे दरवाजे तोडून मुद्देमाल घेवून चोरटे फरार झाले.
आज दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता संजयसिंग यांचे मेहूणे करणसिंग सिसोदीया हे झाडांना पाणी देण्यासाठी आले तेव्हा त्यांना दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी फौजफाटा दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. श्वानपथकाला बोलविण्यात आले. श्वानने काही अंतरापर्यंत माग काढला त्यानंतर श्वानला माग सापडला नाही. गिरासे यांच्या घरातून किती रुपयांचा मुद्देमाल गेला हे मात्र समजू शकले नाही.

 

LEAVE A REPLY

*